Sunday, December 01, 2024

Sunday, November 24, 2024

वय आणि समजूतदारपणा

                 समाजाचा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावर होतो. लहानपणापासून वयात येत पर्यंत सभोवताल घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करत असतो. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ती वेळ यावी लागते. 

                   कानांनी एकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतः बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नवा नव्हेच. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच वयात कळेल अस होत नाही. वयात आल्यावर ती गोष्ट आपोआप आत्मसात केल्या जाते, त्यासाठी सल्ल्याची गरज भासत नसते. जेव्हा व्यक्तीला परिपक्वता येते तेव्हा समज येते, काही गोष्टीबद्दलचा समज हा बदलू शकतो. आपण भूतकाळात विचार केला तो चुकीचा होता हे सुद्धा प्राप्त होऊ शकते.

                आजच्या काळात विचारांने समृद्ध असणे फार गरजेचे आहे. योग्य समज येणे ही काळाची गरज आहे. भूतकाळात आपले काही विचार असतील पण त्याच मुद्द्यांवर आता वर्तमानकाळात वेगळे विचार असू शकतात. काळानुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे.


Sunday, November 17, 2024

असच काही

           नात्यामधले वाद हे अमावस्याच्या रात्री सारखे असतात. अमावस्येला सगळीकडे काळोख अंधार असतो. रोज आसमंत प्रकाशित करणारा चंद्र दिसत नसतो. अमावस्या संपली की हळू हळू चंद्राचं नवीन रूप पाहायला मिळते. दररोज चंद्र कलेनी वाढत जातो आणि मन ओढून घेणारी पौर्णिमेची रात्र येते. पौर्णिमेचा चंद्र बघून मनाला शांत वाटते. कवीच्या मनात घर करतो. 

           अश्याचप्रकारे मैत्रीमध्ये वाद झाले की मन उदास होते पण प्रेमापोटी वाद विसरून एकत्र येणे हे पौर्णिमेच्या रात्री सारखे असते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नात्यामध्ये एक वेगळं तेज निर्माण होते आणि रागावणाऱ्या चेहऱ्यावर आनंदाचे बोल असतात अशीच ही वळण त्या मैत्रीला पुन्हा घट्ट करून जातात.

Sunday, November 03, 2024

मैत्रीण कशी असावी....

एक तरी मैत्रीण अशी असावी
हाक मारताच ती जवळ असावी

महिन्यांनी भेटली तरी नात तेच असावं
प्रेम आणि जिव्हाळा मनापासून असावं

ना सोशल मीडियाचा रोग असावा
ना मैत्रीचा दिखावा असावा

कायम मैत्रीतील प्रेम असावं 
मन भेटण्यासाठी आतुर असावं


Sunday, October 20, 2024

स्वप्न स्वप्नच राहिले

      भविष्यातील आकांक्षा वर्तमानकाळात विचार करून ठेवून त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारी धडपड ही फक्त स्वप्नांसाठी असू शकते. स्वप्न म्हणजे काय ? गाढ झोपेत आपल दिसणार अस्तित्व की आपल्याभोवती दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, हे सर्व खर असल्याचा भास होणारं स्वप्न. दुसरं स्वप्न म्हणजे आपल्या भविष्यात आपल्याला काय हवं आहे हे सांगणारं.

        झोपेत दिसणारी स्वप्ने ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या, कानांनी ऐकलेल्या  किंवा रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीवरचा भास असतो. पण डोळे उघडे ठेवत मनात साठवलेले स्वप्न ही भविष्याची तिजोरीच.

        व्यक्ती जवळील असेल तरीही एकमेकांच्या दूर का जातात ? जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा दुरावा निर्माण होतो. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या की यातना होतात. मग भविष्यासाठी पाहलेली स्वप्न कमळाच्या फुलाप्रमाणे फुलायच्या ऐवजी गळून पडलेल्या पाकळ्यांसारखी झाली तर ? स्वप्नात तर कमळ अपेक्षित होत पण काय मिळालं कोमेजून पडलेल्या पाकळ्या. प्रत्येकाला कमळ मिळेलच असं नाही, कोमेजलेल्या पाकळ्या हातात जरी आल्या तरी त्यातून सुगंध देणाऱ्या अगरबत्ती बनवायची क्षमता असावी.

        माझे ही काही स्वप्न ही स्वप्नच राहिले. वाटायचं भविष्यात आपण पाहलेली  स्वप्न पूर्ण होणार पण तस काही झालं नाही. आता ते सर्व अशक्य वाटू लागले. स्वप्न पूर्ण न होण्याचं दुःख होतं पण त्याहून नवीन रमणीय स्वप्न पाहण्याची दिशा मिळाली.

         आयुष्यात पाऊल थांबता कामा नये. पाऊल थांबलं म्हणजे प्रगती थांबली. एक एक पाऊल टाकत कधी आयुष्याचे धडे गिरवत यशापर्यंत पोहचणार हे कळणार पण नाही. आपल्या हातून काय निसटून गेलं यापेक्षा आता आपण काय हातात पकडू शकू याच प्रेरणेने जीवन जगणं महत्त्वाचं आहे 

Sunday, October 13, 2024

समुद्र 🌊

भरतीच्या प्रवाहाने पाय झाले ओलेचिंब
निळ्याशार पाण्यात पाहिले मी माझे प्रतिबिंब 

अलगद पायाखालून रेतीचे कण निसटून गेले
मोत्यांचे आणि शंख-शिंपल्यांचें ते माहेर घर झाले

अथांग अश्या समुद्राने पाहिले सूर्यास्ताचे रूप
क्षणात दिसले आकाशात डौलदार रंगांची झेप

वाहत येणाऱ्या लाटांनी कानाला दिली साद 
पाण्याच्या प्रवाहापुढे कशाची चालत नाही दाद 

सागराचं आणि शितल चंद्राचं नात हे वेगळं
 प्रेमाचा जिव्हाळा आणि भरती-ओहोटीचा खेळ

समुद्राचे रूप पाहून मन झाले बेभान
वर्षातून एकदा तरी भेट देता यावी किमान

 हृदयात साठून गेली विशाल समुद्राची दृष्टी 
किमया त्या देवांची ज्यांनी निर्माण केली हि सृष्टी



Thursday, October 10, 2024

अनमोल रत्न

         काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाही आपल्या परिवारातील, आपल्या जवळील व्यक्ती हरपला असेच वाटू लागले. मी तर त्यांना भेटले पण नाही, फक्त त्यांचा फोटो बघितला पण इतका जवळच नात कस काय तयार झालं असावं, की माझ्या मनाला दुःख वाटू लागले.
 
         आज या बातमीने पूर्ण देश हळहळ व्यक्त करतो आहे. आज आपल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगात टाटा एक ब्रँड म्हणून प्रसिध्द आहे. हा ब्रँड बनवण्यासाठी घेतलेले कष्ट अवर्णनिय आहे. घराघरात मिळणाऱ्या मिठापासून ते विमानाच्या प्रवासापर्यंत सर्व क्षेत्रात टाटा या ब्रँड ने डंका वाजवला आहे. एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून टाटांच नाव आहे.

        खर सांगायचं तर माणूस कितीही मोठा झाला तरी माणुसकी कायम ठेवता आली पाहिजे आणि हेच कारण की रतन सर विषयी सर्वांना आदर वाटतो. स्वतः उद्योजक असेल तरीही आपल्याला समाजाला देणं लागते या निष्टेवर ते कार्य करत आले. आतापर्यंत केलेली देशसेवा, समाजसेवा, लोककल्याणासाठी दान धर्म ही सर्व देशाच्या प्रेमापोटी. 

          नक्कीच काहीतरी वेगळं होतं. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. साधं राहणीमान, दुसऱ्यांना नम्रतेने वागवणे या काही निवडक गोष्टी. आपले आदर्श हेच असावे. एक दिवस हा येणारच होता हे सर्वांना माहीत होते. पण हे असं व्हावं कोणाला वाटत नव्हते.

असे देवमाणूस पुन्हा होणे नाही.
भावपूर्ण आदरांजली 

Sunday, October 06, 2024

चित्रकला भाग ८

काडीपासून रंगकाम

माता सरस्वती


राधाकृष्ण



घर कसे असावे

मोर कला


Sunday, September 29, 2024

मी एक कलाकार

          रोजच्या जीवनात मला अनेक प्रश्न पडायचे त्यातला एक म्हणजे मी कोण आहे ? विचारांची पातळी उच्च असल्यास हा प्रश्न कठीणच वाटेल. मी कोण आहे ? माझी ओळख काय आहे ? माझ्यात अस काही वेगळं आहे का ? आजच्या धावत्या युगात मी स्पर्धा करू शकेल का ? असे अनेक प्रश्न सतावत राहायचे. एक दिवस ठरवल आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं. 

         प्रत्येक व्यक्ती विशेष असतोच पण विशेष व्हायला मेहनत लागते, मेंदूचा वापर करावा लागतो. मी म्हणू शकते मी एक कलाकार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट व्हावं लागेलच अस काही नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. 

        मी ओळखली माझी कला. ती कला करताना माझं मन रमत. मला उत्साही वाटतं. ती कला पूर्ण होत पर्यंत समाधान वाटत नाही. अश्या विविध कला जोपासणे आजच्या काळाची गरज आहे. शाळेत शिकत असताना या गोष्टीचं महत्त्व कळायचं नाही पण याच गोष्टी आपल्याला किती आनंद देऊ शकतात, आपले मानसिक आरोग्य चांगले राखू शकते हे कळले.

          आजच्या काळात सोशल मीडिया मुळे कितीतरी प्रकारच्या कला जगासमोर आल्या आहेत. कधी विचार केला नव्हता त्या सुद्धा कला बघता येत आहे, शिकता येत आहेत. जग फार मोठे आहे, नवीन जगासोबत नवीन गोष्टी शिकणे तितकेच गरजेचे आहे.

         भरतकाम, ग्रिटींग कार्ड, मेहेंदी, चित्रकला, रांगोळी, सजावट, संगीत, स्वयंपाक, रंगकाम, शिलाई काम, नृत्य, गायन, लिखाण, वाचन अश्या अनेक प्रकारचे छंद बाळगायला हवे. छंद म्हणजे फावल्या वेळेत करता येणाऱ्या कृती. याच छंदातून अनेक लोक व्यवसायाकडे वळतात. पण सर्वप्रथम प्राधान्य शिक्षण आणि नोकरीला द्याला पाहिजे. 

         आपण विचार केलेली भविष्यातील परिस्थिती तशीच असेल अस होत नाही. काळानुसार निर्णय बदलावे लागतात. एकच म्हणायचं आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहा. 


Sunday, September 15, 2024

गणेशोत्सव २०२४

गजानना श्री गणराया
आधी वंदू  तुज मोरया


       ऑगस्ट महिन्याची चाहूल लागली की सणांची सुरुवात होते. रक्षाबंधन पासून ते दिवाळी हा काळ सर्वांसाठी आनंदाचा असतो. आपली संस्कृती, आपले सण हे आपुलकीचे बंध निर्माण करतात. त्यात एक महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव.

       प्रत्येक लहान मोठ्या भक्ताला गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असते. मागच्या वर्षी सारखाच यावर्षी सुद्धा १० दिवस वेगळाच उत्साह असतो. पूजेत सर्वप्रथम श्री गणेश पूजन केले जाते. गणपतीला अनेक नावे आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या शब्दांच्या गजरात, बाप्पाच स्वागत केले जाते. मनासारखी सजावट व्हावी म्हणून सर्व सज्ज असतात. मित्र मंडळा तर्फे स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे रूप खूपच मनमोहक असते. ढोल ताशे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमायला लागतो. बाप्पांना आवडणारे मोदक घरोघरी बनवले जातात. वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होते. आपली संस्कृतीच जतन आपणच करायला हवं. 



#गणेशोत्सव २०२४

Wednesday, August 14, 2024

खरचं देश स्वतंत्र झाला काय ?

                 आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले. मुलीला हातात घेऊन बाबाचा आनंद गगनात मावेना, आईने ९ महिने पोटात वाढलेल्या बाळाला कुशीत घेतल तेव्हा उर दाटून आला.

                   मुलीच्या रुपात साक्षात लक्ष्मीने जन्म घेतला, मुलीचा पायगुण घराला लागला. घराची भरभराट झाली. ते कुटुंब फार आनंदी होत. मुलगी जशी मोठी होऊ लागली तसे आईबाबा तिचे लाड पुरवत गेले, तिच्या स्वप्नांसाठी ते झटत राहिले. आपली मुलगी शिकून खूप मोठी व्हावी, आपलं नाव तिने मोठे करावे हीच इच्छा बाळगत ते मुलीला शिक्षणासाठी दूर पाठवू लागले. मुलगी पण तशीच जिद्दी, चिकाटी वृत्तीची, तिने आपल्या स्वप्नांना पंख दिले, खूप मेहनत घेतली. आपल्या आई बाबाच नाव मोठं करण्यासाठी ती कष्ट घेत राहिली.

                नियमितपणे रोजची कामे करत असताना अचानक घरच्यांना फोन येतो, तुमच्या मुलीने आत्महत्या केली. नेहमी सारखे आनंदात जगण्याऱ्या कुटुंबाला राक्षसाची नजर लागली. जिवाचे हाल करून मोठ केलेल्या मुलीच्या बाबतीत ही घटना एकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही समजेना, काही सुचेना, काय झालं असेल ते ही कळेना. गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपणाऱ्या मुलीला त्या आई वडिलांनी आपल्या मुलीला मृत अवस्थेत बघितलं, रक्तबंबाळ शरीर, अस्त्यावस्त असलेलं निर्वस्त्र शरीर. दोघांचं काळीज चिरून उठलं.  दोघांचा आक्रोश आसमंतात पोहचला.

            त्या मुलीची अशी अवस्था का झाली ? तिने अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले होते ? रात्रीच्या वेळी ती आपली नोकरी करत होती ? स्वतःसाठी नाहीतर दुसऱ्या जीवांना जपत होती ? ती कामाच्या जागी एका हॉल मध्ये आराम करत होती ? काय होती तिची चुकी ?

               जिवाचे रान करून अभ्यास करून शिक्षण घेतल ? स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी झटत होती ? कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित असणार हा विचार करत होती ? या होत्या तिच्या चुका ?

                मुलींनी बलात्काराच्या भीती पोटी घरीच बसायचं का ? शिक्षण घेऊन पण घरचीच कामे करायची का ? आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आकाशात घेतलेली झेप थांबवायची का ?

               चूक करणाऱ्या पेक्षा चुकीच्या गोष्टीबद्दल मौन राहणे हे जास्त अपराधी आहे. सतत घडणाऱ्या गोष्टींना आळा घालणं हे जास्त महत्त्वाचं वाटते. प्रत्येक दिवसाला काही न काही नवीन धक्कादायक बातम्या समोरच येतात पण न्यायाच काय ? आरोपी लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व कधी थांबणार ? कधी हा देश बलात्कार मुक्त होणार ? या अश्या राक्षस वृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नकोच.

        भारत भूमी ही संतांची भूमी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, थोर महापुरुष, राजे, महाराजे यांनी स्व मेहनतीवर स्वराज्य निर्माण केले. त्याच भूमीवर अश्याप्रकरचे दुष्कर्म थांबत नाहीत हे बघून मनाला अत्यंत दुःख वाटते. सर्वांनी एकमेकांना जपा, अस कृत्य कोणासोबत घडू नये..... बाकी काय अजून समोर खूप काही बघायचचं आहे..........


हा देश माझा याचे भान,
जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या
अभिलाषा यांची धरिता
कुणी नजर वाकडी करिता
त्या मरण द्यावया,
स्फुरण आपुले बाहु पाऊ द्या रे ॥


Sunday, August 04, 2024

न संपणारं दुःख

                माणसांच्या जीवनात भावनांच चक्र सुरू असते. कधी चेहऱ्यावरचं गोड हसू, कधी क्षणात आलेला राग, कधी डोळ्यातून वाहलेले अश्रू तर कधी मनातल्या मनात साठवलेली भावना.

                सुख सर्वानाच हवं असते. माणसाला सुखात राहावं वाटते. पण हे सुख कायम असेल अस नसतेच. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार होतच असते. सुखाबद्दल नेहमी बोलले जाते पण दुःखाचं काय ?

                दुःखात माणूस हताश होतो, नैराश्यात जातो, मानसिकरीत्या दुबळा बनतो, आणि या संकटांतून सावरायला फार काळ लागतो. नियतीने प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे. ज्याने या धरणीवर जन्म घेतला तो एक ना एक दिवस अनंतात विलन होणारच हा निसर्गाचा नियमच आहे.

              आपल्या जीवनात आपण आपल्याकडे असणाऱ्या आधारामुळे जीवन जगत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे जीव लावणारी माणसं असतातच. आपल्यासोबत आपली जवळची व्यक्ती आहे याचं समाधान असते. पण काही कारणास्तव ती व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्यास होणारा त्रास हा असहनीय असतो. ज्या व्यक्तीला डोळ्यादेखत आपण बघतो, बोलतो ती व्यक्ती एक दिवस कायम आपल्याला सोडून जाते यातून मनाला लागणारा धक्का अविश्वसनीय असतो. यापेक्षा कोणतेही दुख मोठे नाही.

              जरी हे सर्व आपल्यासोबत घडू नये याची मनात धारणा ठेवली तरी, हे दुःख कोणापासूनही वंचित नाहीच. आज काय घडेल किंवा उद्या काय घडेल याची शाश्वती नाही.

Sunday, July 21, 2024

बंधन

           लहान असताना मोठ लवकर व्हावं अस वाटते आणि मोठ झाल्यावर वाटते अजून बालपणात जगावं. बालपणातील निरागसपणा, जबाबदारी मुक्त, मजेत असणार लहान मूल परत व्हावंसं वाटते.  जसं जसं मोठं होत असतो तस अनेक गोष्टीचं वजन वाढत जाते. प्रत्येक गोष्ट मनासारखी करता यायची पण आता असा काळ आला आपण एखादी गोष्टी बरोबर करत आहो की नाही याची तपासणी करावी लागते.

            लहान असताना आपला जीवनक्रम अगदी ताण मुक्त होता पण आता रोजच्या दिनचर्येत वापरत असणाऱ्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो, अंघोळीसाठी साठी साबण कोणता वापरावं, केस धुवायला कोणता शाम्पू चांगला असेल ज्यामुळे केसांची काळजी घेता येईल, तेल कोणतं वापरायचं, टूथपेस्ट कोणती वापरावी, 
रोज पाणी किती प्यावे, कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले आहे आणि कोणते घातक आहे, जेवताना जास्त पाणी पियू नये, फळ पण वेळेतच खावी  इत्यादी.....

          बापरे ! कितीही चिंता, काही नवीन वस्तू घ्यायचा विचार झाला तरी १० वेळा विचार करावा लागतो, आपल्यासाठी कोणती वस्तू योग्य असेल. समोरच्या दिवसाचं दिनक्रम आधल्या दिवशी करावं लागतं.
म्हणून वय जसं जसं मोठ होत तसं तसं विचार करण्याची क्षमता वाढत जाते आणि मेंदूमध्ये प्रश्नावली तयार होते. आणि यामुळे अती विचारांची समस्या उद्भवू लागते. हातात पैसा जसा येत जातो तश्या माणसाच्या गरजा वाढत जातात.

              या धावत्या युगात साधं राहणीमान लोप पावत असल्याचे दिसून येते. जे आयुष्य आपण लहान असताना जगलो ते आयुष्य आताच्या पिढीला जगता येत नाहीच. आताच्या पिढीच काहीतरी नवीनच असतं. जितका कमी विचार तितके लवकर प्रश्न सुटतील आणि अतिविचारांची, बंधन असल्याची काळजी मिटेल.

Sunday, July 14, 2024

भेटला विठ्ठल माझा 🌸

                प्रत्येक धर्मात अनेक देव आहेत. त्या देवांची पूजा अर्चना केली जाते. भक्ताला देवाने दर्शन द्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संकटात देवाने आपल्याला मदत करावी असे प्रत्येकाला वाटत असते. देवाने स्वयंभू आपल्याला आशीर्वाद द्यावा अस वाटत असते. त्यासाठी फक्त भक्ती करून होत नाही, त्यासाठी आपले आचरण हे देवांच्या शिकवण प्रमाणे असायला हवे. अर्थात देव आहे आपल्या हृदयात असतो, आपण चुकीचं कार्य केल्यास देवाचं आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
            रोजच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला नियम पाळावे लागतात. दुपारच्या वेळेला ट्रॅफिक नसले तरीही १ मिनिटांसाठी सिग्नल वर थांबल्याने मागून येणारे वाहने सुद्धा थांबतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे. प्रत्येकाची मानसिकता नसतेच, ते नियम न पाळता नियमांच उल्लंघन करतात. आपण आपल्या नियमांवर ठाम राहल्यास समोरच्या व्यक्तीला सुद्धा नियमांची कठोरता कळते. अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्यास आपल्याला ही मदत मिळतेच. शुद्ध मन, विचार, आचरण असल्यास देव सतत आपल्या हृदयात विराजमान असतात.

           एकमेकांना मदत केल्यास माणुसकी टिकून राहते. देव कोणत्या रुपात येऊन तुम्हाला मदत करेल हे कळणार पण नाही. त्यामुळे चांगले कर्म करत राहिल्याने त्या कर्माचे गोड फळ मिळतेच.

Sunday, June 16, 2024

सुखदायक वेदना ❤️

              वेदना या कोणत्याही प्रकारात मोडल्या जाऊ शकतात. शरीराला झालेल्या दुखापतीमुळे होणारी वेदना, मनाच्या विरुद्ध गोष्टीमुळे मनाला होणारी वेदना आणि आपल एक काम पूर्ण होत असलेल्यांची एक उल्हासदायी वेदना, आता हे वेदना उल्हासदायी खरच असू शकते का ?

          उल्हास म्हणजे आनंद आणि उल्हासदायी वेदना म्हणजे वेदना होऊन सुद्धा मिळणारा आनंद. एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता मेंदूचा किंवा शरीराचा वापर होतो. एखादी गोष्ट मनात ठरवून ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही अश्याप्रकरच्या खूप गोष्टी असतात, त्यापैकी एक माझी आवड म्हणजे चित्रकला.

             हातात घेतलेली चित्रकला पूर्ण होत पर्यंत माझ मन शांत नसते. हातात पेन्सिल घेण्यापासून ते शेवटचं रंगकाम करून पाण्यात ठेवलेला ब्रश, इतक्या काळात वेळेचं भान नसते, भूक लागली हे सुद्धा कळत नाही, बाकी काम राहील बाजूला पण चित्र पूर्ण होत पर्यंत मी त्या चित्रात गुंतले असते.

            एक चित्र काढायला, रंगवायला साधारण ३ ते ४ तास लागतातच. हा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि त्यात सतत बसून काम करणे, त्यामुळे पाठ दुखू लागते, बारीक काम असेल तर हात सुद्धा दुखून येतो. एकदाच चित्र पूर्ण झालं की शरीराला आराम दिल्यावर मिळणार समाधान खूप वेगळ असते.

            शरीरात वेदना झाल्या असतील तरीही त्यापेक्षा चित्र पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो त्यामुळेच याला उल्हासदायी वेदना म्हणतात. एखादी गोष्टीची मनापासून आवड असल्यास ती पूर्ण होत पर्यंत सतत प्रयत्न केल्यास मिळणाऱ्या फळाची चव गोडच लागते. ती कला असो वा गिर्यारोहण असो किंवा आपले छंद.......

Monday, June 10, 2024

वेळेचे नियोजन 🕐

           आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला सारखाच वेळ मिळतो. त्यात वेळेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला यश लवकर मिळत.

           वेळेचे नियोजन का आवश्यक आहे ? गेलेली वेळ परत मिळत नाही. वेळेचं महत्त्व अन्यसाधारण आहे. थोर पुरुष वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाही. कमी वेळेत आपली कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन गरजेचं असते.

            रात्री झोपण्याआधी उद्याच नियोजन करणे गरजेचं असते. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्याला हवा हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपल्याला कोणती कामे करायची आहे आणि त्या साठी किती वेळ लागेल याचा अंदाज असल्याने दुसऱ्या दिवशी विचार करण्यात वेळ जात नाही.
           व्यक्तीला काम नसले की माणूस विचार करत बसतो. म्हणून त्यापेक्षा स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हे उपयोगी ठरते.
रोजचे १० मिनिट स्वतःचा विचार केला तरी भविष्यात त्या १० मिनिटांचा परिणाम दिसेलच. 

           आयुष्यातला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. एका सेकंदाला वाया घालवता कामा नये. जितका ज्ञान मिळवता येईल तितका मिळवण्याचा प्रयत्न करायचं. आजच्या काळात सोशल मीडियाला बळी पडणारे भरपूर आहेत. आपला मौल्यवान वेळ केवळ जिथून ज्ञान मिळते त्यातच वापरावा.

Sunday, June 02, 2024

चालतं बोलतं जीवन

                सर्वांच्या जीवनात संघर्ष असतोच. आपल्या जीवनाची दुसऱ्याच्या जीवनाशी तुलना होऊ शकत नाही. सर्वांच्या जीवनात वेगळे प्राधान्य असते, स्वतःचे समस्या असतात आणि त्यावर स्वतःचे उपायपण असतात. सर्वांसाठी जीवन हे सारखे नसते. जीवनात घडून गेलेल्या गोष्टींमधून शिकवण घेऊन समोर पाऊलवाट करणे हे महत्त्वाचे ठरते. परिपक्वता ही वयामुळे येत नसते ती अनुभवातून येते. नक्की परिपक्वता म्हणजे काय ? जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवताली काय घडते आहे याबद्दल जागरूक असता, जेव्हा तुम्हाला माहित असते काय बरोबर आहे काय चूक आहे, जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या चांगल्या साठी विचार करत असते.

              आतापर्यंत जीवनात अनेक अडचणी आल्या, चढ उतार आले. नेहमी अभ्यासात मग्न होऊन कायम टॉप करणारी मुलगी ते जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत , नवीन गोष्टी आत्मसात करणारी मी एक पूर्णपणे नाही पण स्वतंत्र स्त्री बनली आहे, आणि हा प्रवास घाटात असणाऱ्या वळणांप्रमाने होता.

                जीवन जगताना मिळालेली शिकवण मी ह्या ब्लॉगमध्ये लिहिते आहे. एक न एक दिवस सर्व ठीक होईल हे अनुभवातून शिकायला मिळाले. देवाचं सगळीकडे लक्ष असते, आपण काय क्रिया, प्रतिक्रिया करतो हे सर्व देवाला ठाऊक असते. आपण आज जरी एखाद्या गोष्टीवरून काळजी करत असू ती एक दिवस नक्कीच काळजी मिटेल. प्रत्येक वेळेस आपले निर्णय बरोबर असतीलच असे नाही कधी ते चुकतात पण तीच चूक आपल्या हातून घडली हे मान्य करणे आणि तीच चूक परत न करणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

             एक मुलगी म्हणून प्रत्येक क्षणाला स्वतःला सावध ठेवणे खूप गरजेचे आहे.  सार्वजनिक ठिकाणी वावरताना क्षुद्र लोक आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, वेळ काय झाली असे प्रकारचे प्रश्न विचारतात या गोष्टींना बळी न पडता तिथून काढता पाय घेऊन सावध राहण्यात जबाबदारी आहे. 

                प्रत्येक गोष्टीला होकार द्यालाच हवा अस काही नसते. नकार द्यायला पण शिकायला पाहिजे. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्याला नकार देताना विचार करावा लागतो पण आपण स्वतःला महत्त्व द्यायला पाहिजे आणि आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीला सरळ नकार देता आला पाहिजे. सर्वांच्या मदतीला आपण धावून जायचं पण आपल्या मदतीला कोणी नाही असं नको व्हायला.

              कधी कधी मनात विचार येतो ४ वर्षापूर्वी सोशल मीडिया न वापरण्याचा निर्णय हा सर्वात अचूक होता. सोशल मीडिया हे एक जाळं आहे. तरुण पिढीसाठी हे एक व्यसन होत चाललंय. तास न तास कसे चालले जातात याच भान राहत नाही. एखाद्या व्यक्तीची चांगली पोस्ट बघितल्यास आपलं जीवन अस का नाही ? किंवा मी त्या व्यक्तीसारखी का नाही ? हे विचार करून मनात मत्सर निर्माण होतो. हे सर्व थांबायला हवं. सर्वांना एक अमूल्य जीवन मिळालेलं आहे. आपल्या अमूल्य वेळेला या सोशल मीडियाच्या नादात वाया घालवता कामा नये.

          डोळे बंद करा आणि कल्पना करा तुम्हाला काय करावं वाटते मी पण केलं, माझं ह्रदय म्हणालं तू चित्र काढ मी काढलं नंतर परत कल्पना केली , माझं ह्रदय म्हणालं तुझ्या आयुष्यात तू रंगबेरंगी रंग भर, मी रंगकाम केलं. मी परत कल्पना केली, माझं ह्रदय म्हणालं तू एक वाद्य शिकायला पाहिजे आणि मी शिकायला सुरुवात केली. मी परत कल्पना केली माझं हृदय म्हणालं तू नाच, तू गाणं म्हण, तू स्वयंपाक कर, तू भरतकाम कर...... आणि मी माझ्या हृदयाचं ऐकत सर्वच केलं.

           मी हे सर्व केलं कारण मला करायचं होत, माझी आवड आहे, त्यातून मला खूप आनंद आणि समाधान मिळते. माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता २ वर्षात ६३ ब्लॉग्ज मार्फत वेगळे वेगळे विचार मांडण्यात आले. 
 
           देवा, इतक्या अडचणी का आहेत माझ्या जीवनात ? असा प्रश्न केल्यास उत्तर काय असेल ? देव म्हणतात तू जर रात्रीचा अंधार बघितला नाही तर तुला सूर्याचं महत्त्व कस कळेल तसच जीवनात अडचणी आल्या नाही तर तुझ्या जीवनातील सुखाच्या क्षणात आनंद कसा मिळणार. त्यामुळे प्रत्येकाला आपली सुख दुःख सांभाळून जीवन जगावे लागते.

        अर्थात कितीही बिकट परिस्तिथीला मात करण्यासाठी जिद्द, कसोटी असावी लागते, ताण तणाव न घेता आनंदाने जीवन जगण्यात काही वेगळीच मजा आहे.




Tuesday, May 21, 2024

निःशब्द

                आजच्या काळात ताण तणाव वाढत चाललेला दिसतो.  दररोजच्या चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली, त्या बातम्या वाचता वाचता मन दुखत, प्रत्येक दिवसाला बातम्यांमध्ये अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून प्रकरण, जंगली प्राण्यांचा हल्ला, दुर्घटना, अपघात इत्यादी प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. हे असं सर्व वाचून मन खूप दुखावलं जातं,  देवाने इतक्या सुंदर सृष्टीची निर्मिती केली आणि आजचा माणूस खरचं माणसाप्रमाणे वागत आहे का ?

                 लोकांची मानसिकता माणसाप्रमाणे का राहिली नाही ? हे सर्व पाप करून काय सिद्ध करतात ? या चुकीच्या गोष्टी करून काय समाधान मिळते ?  निसर्गाचा, माणुसकीचा का विनाश करू पाहत आहे ?

               हे सर्व प्रश्न रोजच पडतात. लोकसंख्या जास्त, वेगळे विचार असणाऱ्या लोकांची संख्या जास्त, इतक्या लोकसंख्येला नियंत्रित करणं साधं सोपं नाही पण अस्या घटना देशाला काळीमा फासतात, गुन्हेगाराला त्याच्या चुकीची शिक्षा मिळत नसेल तर ही खरचं न्यायव्यवस्थेची लाजेची गोष्ट आहे.

            मणिपूर दंगे, लडाख आंदोलन, बिल्कीस बानो केस, प्रज्वल रेवांना केस, नुकतच पुणे मध्ये अपघात झाल्याचं प्रकरण, गुन्हेगाराला शिक्षा मध्ये काय तर निबंध ? खरचं २ निष्पाप जीवाची हत्या केलेल्या गुन्हेगार पैसे वाल्याचा मुलगा म्हणून त्यात शिक्षा म्हणून निबंध, वा रे वा कमालच झाली. घाटकोपर इथे होर्डींग पडल्यामुळे मृत पावलेल्या कुटुंबांनी काय करायचं ? आणि त्यांच्या जीवाची किंमत किती तर ५ लाख, वा रे वा सरकार ,  स्वप्नील लोणकरची आत्महत्या, निर्भया कांड, डॉक्टर च्या निष्काळजीमुळे मृत्यू.

           हेच दिवस बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस भारताचे संविधान लिहिण्यात वेळ दिला ?
हे काही मोजकेच मुद्दे असे दररोज कितीतरी भयानक गोष्टी घडत आहेत. आणि सामान्य जनतेचे हाल होत आहेत.

             लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांची व लोकांसाठी चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे फक्त देशाचे नोकर आहे, जनतेचे सेवक आहे. पण काही माज असलेल्यांना वाटते की आपल्यापुढे मोठे कोणीच नाही, जनतेचे सेवक आहे तर सेवक पण काम करावे, पण तसं नाही जमणार ना, आधी स्वतःच्या घरात पैसे कसे येतील याचा विचार हे माजलेले लोक करतात. खालच्या पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत सर्व भ्रष्टाचारी असल्यावर सामान्य जनतेच्या समस्या कोण सोडविणार ? 

            जर सरकारी नोकर बनण्यासाठी उच्चशिक्षित/ शिक्षित विद्यार्थांना ३ ते ४ परीक्षा द्याव्या लागतात तर जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्या लोकप्रिनिधीसाठी  परीक्षा का नाही ? सगळी मर मर सामान्य कुटुंबातील तरुणांनी/ तरुणींनी करायची का ? सामान्य कुटुंबातून येऊन सरकार चालवायचं, गुन्हेगार नोंद असताना पक्षात प्रवेश करून करोडोची संपत्ती जमा करून आलिशान बंगले, आलिशान गाड्या घ्यायच्या आणि मिरवायच्या ,श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे आणि गरीब अजून गरीब होत आहे. 

           लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोण पत्रकार, पत्रकारितेची पातळी इतकी खाली घसरली आहे की देशातले ठळक मुद्दे सोडून हिंदु मुस्लिम, आणि फालतू बातम्या दाखवीत असतात. नवीन बातम्या बघण्यासाठी आणि त्या गोष्टीची पूर्ण पडताळणी माहीत करण्यासाठी यूट्यूबर्स ची मदत घ्यावी लागते ही शोकांतिका आहे.

                      आपण समस्येकडे नाही तर उपायाकडे बघितले पाहिजे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता फक्त देशाला एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे प्रामाणिकता. देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपले काम प्रामाणिकरित्या देशाच्या कल्याणासाठी केल्यास आपला देश समृद्ध होण्याच्या मार्गास लागेल.

Saturday, May 18, 2024

स्वभावाच्या लहरी

          एक दिवस असा येतो सकाळी उठायची इच्छा नसते, अस वाटते काहीच करावा नाही फक्त बेडवर पडून राहावं, काही खावं नाही बस आराम करावा. त्यानंतर एखादी दिवस असा अगदी ताकतीने भरलेला असेल काय करू काय नाही असं होईल, काम नसेल तरीही मुद्दामून काही न काही काम काढणार आणि ते पूर्ण करणार. कधी मन खूप आनंदी असेल तर कधी मनात दुःखाचे विचार येतील, कधी काही गोष्टीवर राग सुद्धा येणार हे सर्व प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते.

               प्रत्येक दिवस सारखाच नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे क्षण असतात. त्यामुळे आपण हे सर्व स्वीकारलं पाहिजे आणि हे सर्व सामान्य आहे. आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव झाल्यास आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. स्वतःला खचून जायची परवानगी द्याचीच नाही. आयुष्यात समोर कसे जाता येईल हे बघणे गरजेचं ठरते.

              एकच आयुष्य आहे मनसोक्त जगायचं. आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल विचार करायचं, आपल्याकडे काय नाही हे बघत बसल्यास कायम दुःख वाट्याला येईल. वेळ मिळेल तस नवीन गोष्टी शिकत राहायचं, त्यामुळे आपल्याला विचार करायला वेळच मिळणार नाही.

प्रत्येक गोष्टीला सामना करता आला म्हणजे म्हणता येईल "मी सक्षम आहे."


Saturday, May 11, 2024

का रे दुरावा

          माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. माणूस बोलू शकतो एकु शकतो, बघू शकतो आणि विचार सुद्धा करू शकतो सोबत भावना व्यक्त करू शकतो  हे सर्व तर प्राणी पण करू शकतात पण माणूस हा कोणत्याही क्षेत्रात बुध्दीने अग्रेसर असतो.

          व्यक्तीच्या वागणुकीवर समाजाचा, सभोवतील वातावरणाचा खूप प्रमाणात प्रभाव होत असतो. आपण ज्या भविष्याचा विचार करतो तो खरा होतो, नाही होत यावर प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते पण जास्त प्रमाणात काहीतरी वेगळी परिस्थिती असते. आपण जसा विचार करतो तस काही घडत नसते, आपल्या मनासारखं होत नसल्याने आपल्याला त्या गोष्टीचं दुःख सुद्धा वाटते, डोळ्यात अश्रू दाटतात. पण त्या परिस्थितीला सामना करायला देवाने आपल्या मध्ये शक्ती दिली असते याच भान नसते. आपल्यासोबत २ गोष्टी प्रेमाने बोलले तरी आपल्याला छान वाटते. 

      भविष्यात आपलं जीवन अस असेल तस असेल असा विचार नक्कीच सर्वांनी केलाच असेल पण खरचं ते सर्व खर होत आहे का ?

आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो पण वास्तव नाही. 


मनात गुंफलेल्या तारा सोडवाव्या कश्या

नात्यातला रुसवा, फुगवा सोडवावा कसा

काचेला तडा गेला की वापरता येत नाही 

नात्याला तडा गेला की नात भरून निघत नाही

स्वतःच्या आधी ठेवलेली नाती परकी होतात

काळजी आणि प्रेमाची जागा क्लेश, मत्सर घेतात

नेहमीच्या भेटीची जागा अकस्मात होणारी भेट घेते

घट्ट नातं वाटणाऱ्या नात्यात पोकळ  निर्माण होते




Sunday, May 05, 2024

शिष्टाचार

          आपण रोजच्या जीवनात अनेक लोकांना भेटतो पण त्यातील काहीच लोकांचा मनापासून आदर करतो. दुसऱ्यांचा आदर मिळवण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये तसे गुण असावे लागतात. त्या गुणापैकी एक म्हणजे शिष्टाचार.

       व्यक्ती समाजात कशाप्रकारे वावरतो यावरून माणसाची ओळख होते, त्या व्यक्तीमध्ये सहनशीलता, समजूतदारपणा, शिष्टाचार असणे आवश्यक असते.
शिष्टाचार म्हणजे तुमची समाजात वावरण्याची कला. इंग्रजी मध्ये सांगायचं तर मॅनर्स.  माणूस कितीही मोठा झाला तरी शिष्टाचार विसरायला नको. रोजच्या जीवनात आजूबाजूला आपल्याला नजरेस पडतील.

        माझ्या रोजच्या जीवनातले काही मोजके प्रसंग सांगू इच्छिते. रोजच्या जीवनात आपल्याला कुठे ना कुठे रांगेत उभे राहावे लागते पण त्यात एखादी मागून येणारी व्यक्ती अचानक रांगेमध्ये लागते यावरून त्या व्यक्तीने शिष्टाचारचा आघात केल्याचे दिसते.
लहान मुलांना शिकवण देण्याची गरज असते कारण त्यांना समाजात कस वावरायचं हे कळत नसते पण आता मोठ्यांना पण त्या गोष्टी सांगण्याची वेळ येत आहे हे बघून डोकं थक्क झालं.
नकळत ऑफिसच्या बसमध्ये एकच सीट रिकामी असल्यामुळे तिथे बसली मी आणि माझ्या बाजूला एक मुलगा पायावर पाय ठेवून बसून, मी काहीवेळ वाट बघितली पण त्याने पाय काही काढला नाही शेवटी मला सांगावं लागला की पाय सरळ करा त्यानंतर तो माफ करा म्हणून नीट बसला. विचार आला आता उच्चशिक्षित लोकांना या गोष्टी सांगाव्या लागतात म्हणजे खरचं कमाल झाली.

        समोरच्या व्यक्तीला आपण ओळखत नसलो तरीही आपली वागणूक ही चांगली ठेवावी. तुमच्या समोर नाही म्हटलं तरी मागून तुमची प्रशंसा करतीलच. शिष्टाचार बाळगल्याने माणसाची प्रगतीच होते.

Thursday, April 25, 2024

उन्हाळ्याची सुट्टी😍

           शाळेला सुट्टी लागल्याचा आनंद, मामाच्या गावाला जायचा आनंद, बर्फाचा गोळा आणि कुल्फी खाण्याचा आनंद, अभ्यासाला सुट्टीचा आनंद आणि मनसोक्त वेळ न बघता मित्र मैत्रिणीसोबत खेळण्याचा आनंद हे सर्व फक्त उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतो. उन्हाळा म्हटलं की याच गोष्टी डोळ्यासमोर येतात😅.

        जसं जसं वय वाढत जात तश्या जबाबदारी😌 वाढत जातात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी होत जातात. बालपणीचे मित्र मैत्रिणी👭 दुरावले जातात आणि राहतात फक्त आठवणी♥️...

        अशीच एक आठवण म्हणून बालपणीचे खेळ खाली दिले आहे, कधी एकत्र कुटुंबासोबत वेळ घालवत असणार किंवा भावंडांसोबत एकत्र वेळ मिळाला की खालील खेळ अगदी आनंदाने खेळता येतील.
कारण खेळण्याला वयाचं बंधन नसते♥️


बैठकी खेळ

  1. नाव गाव वस्तू प्राणी 📝
  2. चोर पोलिस चिठ्ठ्या (राजा 1000, दरोगा 700, पोलिस 500 शिपाई २०० आणि चोर 0 )✍️
  3. ४ चिठ्ठ्या ✍️
  4. कॅरम
  5. बुद्धिबळ ♟️
  6. पत्ते (घुस, सत्ती उतरवणे, बिंगो)🃏
  7. चवा अश्टा / छक्का बारा 
  8. झंडी मुंडी
  9. लुडो
  10. साप सिढी🐍🪜
  11. सागर गोटे 
  12. खाऊचे भांडे
  13. बाहुली (कापडाची)
  14. १ उडाला, २ उडाला, ३ म्हणे  डावा उजवा, बोला बोला काय बोलू ? (रंगांची/ फुलांची नावे)
  15. चिमणी उड, कावळा उड 🐤🐦🕊️🦆🦅
  16. तितली उडी, उडके चली🦋
  17. आमचोरी चप्पा चोरी
  18. सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा
  19. खाऊची पार्टी
  20. डॉक्टर डॉक्टर

मैदानी खेळ
 
  1. लगोरी⚾
  2. लंगडी (७ डब्बे/ ६ डब्बे/ लंगडीचा डाव)
  3. टीप्पर 
  4. संकल
  5. तळ्यात मळ्यात
  6. क्रिकेट 🏏
  7. बॅडमिंटन🏸
  8. धाबाधुबी 
  9. लपाछपी 
  10. पिंकी पिंकी व्हॉट कलर ❤️💚💙💛🧡🩷🩶🩵💜
  11. बर्फ का पाणी 🧊💧
  12. बीचका बंदर 🐒
  13. दोरीवरच्या उद्या➰
  14. डोळ्यावर पट्टी लावून डाव
  15. मामाच पत्र हरवल आम्हाला नाही सापडलं
  16. इडलिंबु
  17. संगीत खुर्ची 🪑
  18. चमचा लिंबू 🥄🍋
  19. पुतळा/ statue 🗽

        आजच्या डिजिटल /मोबाईलचा📱 काळ बघता हे सर्व  वरील खेळ विस्मरणात जातील आणि राहतील फक्त आठवणी,
आपल्या समोरच्या पिढीला या खेळाबद्दल माहिती करणे ही आपली जबाबदारी बघता पुन्हा एकदा बालपणाचा सर्वांनी आस्वाद🤩🤩 घ्यायलाच हवा.

          खेळ वाचताच तुम्ही पण आठवणीत रमला की काय ?
चला तर मग समोरच्या पिढीच्या बालपणात या खेळाचे रंग उधळूया☺️☺️🥰.
जिंकणे किंवा हरणे यापेक्षा त्या क्षणातून मिळालेला आनंद महत्त्वाचा असतो.

Sunday, April 14, 2024

पहिल्या कामाचा अनुभव ☺️

             व्यक्तीच्या लहानपणापासूनची शिक्षण ते कामाचा प्रवास हा निराळा असतो. विविध विषय शिकणे, घटक चाचणी, वार्षिक परीक्षा देणे त्यात समोर कोणत्या क्षेत्रात जायचं याचा विचार करणे त्यानंतर प्रवेश होण्यासाठी धडपड करणे हे सर्व एका कामासाठी असत.
             माझ्या पहिल्या कामाची सुरुवात ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड इथून सुरू झाली. बघता बघता कोरोना काळात एक वर्ष सर्व काम घरूनच झालं. चेहरा न बघता रोजच मिळून काम करण्याचा वेगळा अनुभव होता आणि मग काम ऑफिस मधून सुरू करण्यासाठी बोलवलं गेलं. कंपनीकडून असणाऱ्या बस मुळे येणं जाणं सोईस्कर झालं.
       प्रत्येक कुलुपाची एक किल्ली असते तशी, कंपनी मध्ये जाण्यासाठी आयडी कार्ड ला शस्त्र च म्हणावं लागेल. स्कॅन केलं की दार उघडलं. लॅपटॉप ची बॅग प्रत्येक वेळेस येते जाता मशीन मध्ये टाकून स्कॅन करावी, आत बघितल तर अगदी नैसर्गिक वातावरण होते. चाफ्याची, आंब्याची झाडे सोबत अजून रंगीबेरंगी फुलांची झाडे. हे सर्व पाहून मन आनंदी झाले. पण आता कुठे जायचं याचा विचार करू लागले आणि मग आपल्या ओ.डी.सी. कडे रवाना झाले. 
          बघता बघता सर्व गोष्टींचं कुतूहल सुद्धा वाटू लागले आणि उद्या परत ऑफिस यायचं म्हणून वाट लक्षात ठेवत गेले आणि कामाला सुरुवात झाली. जेवण करायला फूड कोर्टला गेली ते पण भव्य अस होत, अगदी हॉटेल प्रमाणे मेनू आणि सर्व ऑनलाईन व्यवहार, फार छान वाटल. जेमतेम ऑफिस मधून काम सुरू झाल्याने हळू हळू संख्या वाढू लागली. फूड कोर्ट अशी जागा होती जिथे कानाला कुजबुज ऐकू यायची आणि डोळ्यांना नेमके अनेक लोक दिसायचे, नाहीतर ऑफिस मध्ये फक्त शांतता आणि आपल आपल काम.
         काम करण्यासाठी कामाचे वातावरण सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते, किती पण वेगळा विचार डोक्यात घेऊन कंपनी मध्ये पाऊल टाकलं तरी सुद्धा वातावरण बघून मन आनंदी होईल आणि काम करायला भाग पाडेल अस साजेशीर आहे.
     आतापर्यंतच्या प्रवासात अनेक लोकांशी ओळखी झाली आणि सर्वांकडून काही न काही नवीन शिकता आले, यापुढे पण असच आनंदचा प्रवास असावा. 

             जीवनात वय वाढल्याने नाहीतर अनुभवामुळे माणसाची परिपक्वता वाढते. जीवन जगताना असे वेगळे वेगळे अनुभव आल्याने परिस्थितीची जाणीव होते आणि समोर जाऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

Saturday, March 02, 2024

दृष्टी 👀

मनाला स्पर्श करणार दृश्य दिसताच, मोबाईल मध्ये छायाचित्र काढण्याचा मोह होतोच. एक आठवण म्हणून डोळ्यात जपायच की एक आठवण म्हणून कॅमेऱ्यात कैद करायचं, कधी आठवण आलीच की डोळे बंद करून ते क्षण डोळ्यासमोर उभे करावे की मोबाईल मध्ये बघावे,  असे बघता बघता चेहऱ्यावरचे स्मितहास्य खुलावे.

डोळ्यांनी बघितलेले क्षण अविस्मरणीय क्षण कायम आपल्यासोबत असतात, पण तांत्रिक गोष्टीमुळे आपल्या मोबाईलमधले छायाचित्र नष्ट पण होऊ शकतात, आताचा क्षण आनंदाने घालवायचा की मोबाईल मध्ये कैद करून ठेवायचा हा प्रश्नच पडतो.
जानेवारीच्या महिन्यात आलेला आंब्याला बहार
आंब्याचा बहार 
एअपोर्ट मेट्रो स्टेशन नागपूर
श्री राम कृष्ण हरी
दिवाळीचा आनंद आणि फटाक्यांची आतिषबाजी 
कमळ फूलं थेट महालक्ष्मी मातेच्या चरणी
रम्य तो सूर्यास्त
७ दिवसात झाडामध्ये झालेला फरक
आंब्याच्या झाडाला आलेली पालवी 
कुंद्याची फुले
जास्वंदीच्या फुलाचा महिमा
काटेसावर 
४ पानाच बेलपत्र


पळस








चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...