Wednesday, February 04, 2026

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेला जायचं, अभ्यास करायचा, जेवण करायचं, खेळायचं आणि झोपायचं....... मात्र आता स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊनच सर्व कार्य पार पाडावे लागते. आणि या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता येणारा ताण तणाव हा काही दूर नाही. कितीही विचार केला की ताण घ्यायचा नाही तरीही ताण काही आपली साथ सोडत नाही.

             प्रेमानंदजी महाराज म्हणतात काय इतका स्वतःला तणाव करून घ्यायचा, ईश्वराचे नामस्मरण करा सर्व चांगलं होईल. हे अगदी खर आहे. पण कधी कधी असहनीय अश्या घटना आपल्या जीवनात घडतात आणि त्या गोष्टीचा ताण पूर्णपणे विसरणे ही साधी गोष्ट नाही. आतापर्यंत जे काही झालंय त्यामागे कधी कधी चांगला हेतू असतो.

             आज माणसाकडे सर्व गोष्टी असूनही माणूस ताण तणाव मध्ये दिसतो. नोकरी असणारा किंवा नोकरी नसणारा, अमाप संपत्ती असणारा किंवा कमी पैसे असणारा इ. लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. समोरील व्यक्ती हसत बोलत असेल तरीही मनात किती काही दाटून भरले असेल याचा अंदाज लावणे कठिणच.....

              आयुष्यात आनंद साजरा करणे हे खूप महत्त्वाचे ठरते. आनंदाचा क्षण असला की मनातून दुःख आपोआप चालले जाते. आणि हसण्याने मन आनंदाने प्रफुल्ल होते. आपण  आशेच्या किरणांनी भरलेल्या दिवसाची वाट बघत बसतो, पण तो दिवस लवकर दिसावा यासाठी आपण किती मेहनत करतो याला महत्त्व आहे. मी मेहनत केली म्हणूनच आज हे यश मला मिळाले असे ठामपणे आपण बोलायला हवे....


Thursday, January 01, 2026

नवीन वर्ष - नवीन उमेद

हे ईश्वरा सर्वांना
चांगली बुद्धी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात
आनंदात ऐश्वर्यात ठेव
सर्वांच भल कर
कल्याण कर रक्षण कर
आणि तुझे गोड नाम
मुखात अखंड राहू दे

Wednesday, December 31, 2025

सरते वर्ष

             आपल्या महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला साजरी करण्यात येत असली तरीही ३१ डिसेंबरची चाहूल सर्वांनाच असते. आणखी एक वर्ष संपत आलंय आणि दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाचा सूर्य आसमंताला प्रकाशित करणारा असेल.

             ठरलं काय ?  अरे पण काय ठरलं ? ३१ डिसेंबर विशेष योजना काय आहे ?  डिसेंबर महिना सरतेवेळी सर्वांच्या चर्चेचा विषय असतो. लहान मुली मुलांना फार कौतुक, वर्षाचा शेवटचा दिवस पण मोठ्यांच्या मनात एकच विचार असतो अरे बापरे ! हे वर्ष किती लवकर संपलं. किती लवकर लवकर दिवस गेले. घड्याळ ही आपल्याच वेगाने चालत असली तरीही आता वेळ खूप कमी आहे अस आपल्याला भासत असते. सर्व आपल्या कामात मग्न असतात आणि त्यामुळे वेळेचे भान नसते.
  
              प्रत्येकाच्या मनात नवीन वर्षाबदलच्या नवीन आकांक्षा निर्माण होतात. जरी हे वर्ष कष्ट करण्यात गेलं असेल तरी नवीन वर्षी नवीन यश हातात येऊ देत हिच इच्छा बाळगत नवीन वर्षाच स्वागत करत असतात. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आपल्याकडून झालेल्या चुका सुधारून नवीन आयुष्य घडवायला मिळतं.

Tuesday, December 02, 2025

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली 
माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली

लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन
तारे बघण्यात माझे कमल नयन झाले मग्न 

असंख्य ताऱ्यांच्या जगात मी होती तीला शोधत  
ती स्वयंप्रकाशित चांदणी माझ्या पडली नजरेत

आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि ३ चोर 
शोधण्यात मग्न झाले आणि दिसली उगवती चंद्रकोर 

चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून कौतूक वाटले
चांदण्या मोजता मोजता थंडगार हवेत डोळे निजले 

Sunday, October 26, 2025

आली दिवाळी 🪔



मी रांगोळी काढत असताना तू अलगद क्षण कॅमेरा मध्ये टीपावे. 
माझं लक्ष जाताच मी हसून पोझ द्यावी

दिवाळीची खरेदी करून तू आणावी आणि 
त्याचा उपयोग आपल्यासाठी करावा

चक्कीवरून दळण तू आणून द्यावे,
दिवाळीचा फराळ आपण बनवावा

तू घराला रोषणाई करावी
मी घराची लक्ष्मी घराला समृद्ध करावं

आपल्या संसाराच्या प्रकाशित दिव्याची वात मी 
तर त्या ज्योतीला प्रकाशमान ठेवणारं तेल तू असावं

तू छान रंग मला आणून द्यावे
मी दिव्याला सुंदर रंगकाम करावे

सूर्यास्त झाल्यावर दिवे घेऊन मी अंगणात पाऊल टाकावं
आणि तू ते दिवे सजवून ठेवावे

झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण दारी तू लावावे,
लक्ष्मी आपल्या घरी नांदावी यासाठी प्रवेशद्वाराची पूजा मी करावी

गाय आणि वासरू तू शोधून आणावे, 
भुरशीची पूजा करून मी गायगोधन  करावे

नरक चतुर्दशीच्या पहाटे उठून उत्साहात तू असावं, 
सुगंध उटन बनवून तुला प्रेमाने मी लावावे

लाकडी पाटावर विराजमान तू व्हावे, 
दीपावली पाडव्याला मी तुला ओवाळावे

पूजेला तू पारंपरिक पोशाख घालावा, 
सौभाग्यलंकार ठहराव करून मी नऊवारी घालावी

प्रत्येक पूजेला जोडीने देवाचा आशीर्वाद घेऊन 
आपला संसार सुखाचा असावा ही प्रार्थना करावी



आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...