आजच्या काळात ताण तणाव वाढत चाललेला दिसतो. दररोजच्या चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली, त्या बातम्या वाचता वाचता मन दुखत, प्रत्येक दिवसाला बातम्यांमध्ये अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून प्रकरण, जंगली प्राण्यांचा हल्ला, दुर्घटना, अपघात इत्यादी प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. हे असं सर्व वाचून मन खूप दुखावलं जातं, देवाने इतक्या सुंदर सृष्टीची निर्मिती केली आणि आजचा माणूस खरचं माणसाप्रमाणे वागत आहे का ?
लोकांची मानसिकता माणसाप्रमाणे का राहिली नाही ? हे सर्व पाप करून काय सिद्ध करतात ? या चुकीच्या गोष्टी करून काय समाधान मिळते ? निसर्गाचा, माणुसकीचा का विनाश करू पाहत आहे ?
हे सर्व प्रश्न रोजच पडतात. लोकसंख्या जास्त, वेगळे विचार असणाऱ्या लोकांची संख्या जास्त, इतक्या लोकसंख्येला नियंत्रित करणं साधं सोपं नाही पण अस्या घटना देशाला काळीमा फासतात, गुन्हेगाराला त्याच्या चुकीची शिक्षा मिळत नसेल तर ही खरचं न्यायव्यवस्थेची लाजेची गोष्ट आहे.
मणिपूर दंगे, लडाख आंदोलन, बिल्कीस बानो केस, प्रज्वल रेवांना केस, नुकतच पुणे मध्ये अपघात झाल्याचं प्रकरण, गुन्हेगाराला शिक्षा मध्ये काय तर निबंध ? खरचं २ निष्पाप जीवाची हत्या केलेल्या गुन्हेगार पैसे वाल्याचा मुलगा म्हणून त्यात शिक्षा म्हणून निबंध, वा रे वा कमालच झाली. घाटकोपर इथे होर्डींग पडल्यामुळे मृत पावलेल्या कुटुंबांनी काय करायचं ? आणि त्यांच्या जीवाची किंमत किती तर ५ लाख, वा रे वा सरकार , स्वप्नील लोणकरची आत्महत्या, निर्भया कांड, डॉक्टर च्या निष्काळजीमुळे मृत्यू.
हेच दिवस बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस भारताचे संविधान लिहिण्यात वेळ दिला ?
हे काही मोजकेच मुद्दे असे दररोज कितीतरी भयानक गोष्टी घडत आहेत. आणि सामान्य जनतेचे हाल होत आहेत.
लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांची व लोकांसाठी चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे फक्त देशाचे नोकर आहे, जनतेचे सेवक आहे. पण काही माज असलेल्यांना वाटते की आपल्यापुढे मोठे कोणीच नाही, जनतेचे सेवक आहे तर सेवक पण काम करावे, पण तसं नाही जमणार ना, आधी स्वतःच्या घरात पैसे कसे येतील याचा विचार हे माजलेले लोक करतात. खालच्या पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत सर्व भ्रष्टाचारी असल्यावर सामान्य जनतेच्या समस्या कोण सोडविणार ?
जर सरकारी नोकर बनण्यासाठी उच्चशिक्षित/ शिक्षित विद्यार्थांना ३ ते ४ परीक्षा द्याव्या लागतात तर जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्या लोकप्रिनिधीसाठी परीक्षा का नाही ? सगळी मर मर सामान्य कुटुंबातील तरुणांनी/ तरुणींनी करायची का ? सामान्य कुटुंबातून येऊन सरकार चालवायचं, गुन्हेगार नोंद असताना पक्षात प्रवेश करून करोडोची संपत्ती जमा करून आलिशान बंगले, आलिशान गाड्या घ्यायच्या आणि मिरवायच्या ,श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे आणि गरीब अजून गरीब होत आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोण पत्रकार, पत्रकारितेची पातळी इतकी खाली घसरली आहे की देशातले ठळक मुद्दे सोडून हिंदु मुस्लिम, आणि फालतू बातम्या दाखवीत असतात. नवीन बातम्या बघण्यासाठी आणि त्या गोष्टीची पूर्ण पडताळणी माहीत करण्यासाठी यूट्यूबर्स ची मदत घ्यावी लागते ही शोकांतिका आहे.
आपण समस्येकडे नाही तर उपायाकडे बघितले पाहिजे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता फक्त देशाला एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे प्रामाणिकता. देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपले काम प्रामाणिकरित्या देशाच्या कल्याणासाठी केल्यास आपला देश समृद्ध होण्याच्या मार्गास लागेल.
No comments:
Post a Comment