Tuesday, December 02, 2025

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली 
माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली

लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन
तारे बघण्यात माझे कमल नयन झाले मग्न 

असंख्य ताऱ्यांच्या जगात मी होती तीला शोधत  
ती स्वयंप्रकाशित चांदणी माझ्या पडली नजरेत

आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि ३ चोर 
शोधण्यात मग्न झाले आणि दिसली उगवती चंद्रकोर 

चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून कौतूक वाटले
चांदण्या मोजता मोजता थंडगार हवेत डोळे निजले 

Sunday, October 26, 2025

आली दिवाळी 🪔



मी रांगोळी काढत असताना तू अलगद क्षण कॅमेरा मध्ये टीपावे. माझं लक्ष जाताच मी हसून पोझ द्यावी

दिवाळीची खरेदी करून तू आणावी आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी करावा

चक्कीवरून दळण तू आणून द्यावे आणि दिवाळीचा फराळ आपण बनवावा

तू घराला रोषणाई करावी आणि मी घराची लक्ष्मी घराला समृद्ध करावं

आपल्या संसाराच्या प्रकाशित दिव्याची वात मी तर त्या ज्योतीला प्रकाशमान ठेवणारं तेल तू असावं

तू छान रंग मला आणून द्यावे आणि मी दिव्याला सुंदर रंगकाम करावे

सूर्यास्त झाल्यावर दिव्यांच ताट घेऊन मी दाराबाहेर पाऊल टाकावं आणि तू ते दिवे सजवून ठेवावे

झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण दारी तू लावावे, लक्ष्मी आपल्या घरी नांदावी यासाठी प्रवेशद्वाराची पूजा मी करावी

गाय आणि वासरू तू शोधून आणावे, भुरशीची पूजा करून मी गायगोधन  करावे

नरक चतुर्दशीच्या पहाटे उठून उत्साहात तू असावं, सुगंध उटन बनवून तुला प्रेमाने मी लावावे

लाकडी पाटावर विराजमान तू व्हावे, दीपावली पाडव्याला मी तुला ओवाळावे

पूजेला तू पारंपरिक पोशाख घालावा, सौभाग्यलंकार ठहराव करून मी नऊवारी किंवा सहावारी घालावी

प्रत्येक पूजेला जोडीने देवाचा आशीर्वाद घेऊन आपला संसार सुखाचा असावा ही प्रार्थना करावी



Saturday, September 27, 2025

असा असावा साथीदार 💞

कसा असावा साथीदार तर तो असा असावा


आयुष्यात चॉकलेट देणारा नसेल तरी चालेल पण 
वेळ आल्यावर गोळ्या आणि औषध देणारा असावा

प्रेमाची कबुली देणारा नसेल तरी चालेल पण
 कृतीतून प्रेम व्यक्त करणारा असावा

आनंदाच्या क्षणी सोबत नसेल तरी चालेल पण
 दुःखात असताना साथ देणारा असावा

भेटवस्तू देणारा नसेल तरी चालेल पण
 डोळ्यातले अश्रू पुसून चेहऱ्यावर हास्य देणारा असावा

स्वप्न दाखवणारा नसेल तरी चालेल पण 
स्वप्न सत्यात उतरवायची धमक असणारा असावा

परीकथेतील राजकुमार नसेल तरी चालेल पण 
खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व आदर्श असा असावा

परदेशी नेणारा नसेल तरी चालेल पण 
आवडत्या ठिकाणी फिरायला नेणारा असावा

स्वयंपाक नाही आला तरी चालेल पण 
सोबतीने जेवणाचा आस्वाद  घेणारा असावा

संपूर्ण आयुष्य सुखाचे नसेल तरी चालेल पण 
प्रत्येक क्षणाला साथ निभावणारा असावा

वारंवार कौतुक करणारा नसेल तरी चालेल पण
मनातून कौतुकाची थाप देणारा असावा

पैशाने श्रीमंत नसेल तरी चालेल पण 
मनाने, स्वभावाने आणि माणुसकीने श्रीमंत असावा

माफी मागणारा नसेल तरी चालेल पण
कायम सत्याच्या मार्गाने जाणारा असावा

गोड गोड बोलणारा नसेल तरी चालेल पण
चार चौघात बायकोचा सन्मान ठेवणारा असावा


कसा असावा साथीदार तर तो असा असावा.


Sunday, September 14, 2025

दुर्गती

             कधी कधी मनात विचार येतो, आजूबाजूला किती विचित्र गोष्टी घडत आहेत. नवरात्री सणाला स्त्रीरूपी असणाऱ्या देवीच पूजन केलं जाते. मनोभावे अर्चना केली जाते तो स्त्रीशक्तीचा मान सुद्धा आजची स्त्री ठेवू शकत नाही आहे.

            २०१६ साली जियो कंपनी मार्फत मिळणारा मोफत डेटा आणि कोरोना काळात घरी राहून मोबाईलचा वाढलेला वापर त्यात भर घालणारं सोशल मीडिया. आधीची स्त्री ही स्वतःच्या शरीराला जपायची. डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडू द्यायचा नाही मात्र आजकाल लोकांना दाखवायला ब्लाऊज घालून पदर पाडतात. काही मूर्ख लोक शरीर दाखवून पैसे कमवण्याच्या नादात बुडाले आहेत. आधी कपडे बदलण्यासाठी खोलीचा वापर करायचे मात्र आता कॅमेरा शिवाय पान हलत नाही. लाज- लज्जा सर्व सोडून ही कामे वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया वर चालू आहेत. 

          या गोष्टीमुळे किती नुकसान होत आहे हे कदाचित सरकारला दिसत नसावे. आपल्या सोशल मीडियावर अनेक लोक असे फोटो, व्हिडिओ बघते आहे हे माहिती असून ते स्वतःच्या फायद्याचे विचार करत बसले आहे.

        देशात वाढणाऱ्या बलात्काराला हे ही तितकेच महत्त्वाचे कारण आहे. अडचणीत किंवा एकट्या दिसणाऱ्या मुलीवर अत्याचार होतो. आता म्हणणार माणसाने पण चांगलं वागलं तर अशा घटना थांबू शकतात. ज्या व्यक्तीने चांगल शिक्षण घेतलं आहे ज्यात संस्कार आहे तोच अस वाईट कृत्य करणार नाही परंतु मागासलेल्या क्षेत्रामध्ये किती तरी लोक अशिक्षित असतात आणि त्यांना मुलींचा, बाईंचा आदर कसा करावा हेच माहिती नसते.

               सांगायचं म्हटलं तर माणूस हा वाईट नसतोच पण सभोवतालचे वातावरण, संस्कार यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक दृष्टीने वाढ होत असते. प्रत्येक देशाला ताकद आणि कमकुवतपणा असतो. पण तोच कमकुवतपणा कसा दूर करता येईल याचा विचार कोणी करत नाहीच. 

Sunday, September 07, 2025

यातना

         प्रत्येकाला कधी कधी जीवनात यातना सहन कराव्या लागतात. जोपर्यंत मेहनत नाही तोपर्यंत पैसे नाही आणि पैसे नाहीतर काही नाही. पैसे हे सर्वस्व नाहीच पण आजच्या काळात पैशाशिवाय काही होत नाही.

          कित्येक नोकरदार हे त्यांना न आवडणार काम करत असतात. काम कशासाठी तर हातात ४ पैसे यावे यासाठी सर्व मेहनत असते. कोणाच स्वप्न हे काही वेगळं असते मात्र पैशाखातीर नाईलाजाने काम करावं लागत. महिन्याच्या शेवटी मिळालेला कामाचा मोबदला नोकरी सोडण्याच्या विचारला दूर ठेवतो. रोज कामाच्या ठिकाणी प्रवास करणे, काम करणे त्यानंतर घरची सुद्धा कामे करणे हे काही साधारण नाहीच. मनात काहीतरी वेगळ करण्याची इच्छा असेल तरीही कधी कधी नाईलाजाने त्या करता येत नाही.
 
               कितीही त्रासदायक प्रवास असला तरीही त्या नोकरीमुळे आपलं घर चालते यात समाधान असते. आजच्या काळात पैशाला खूप महत्त्व आहे. पैसे कमावणे ही एक काळाची गरजच झाली आहे. नोकरी असेल तर लोक सुद्धा २ शब्द गोड बोलतात मात्र बेरोजगार असणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. समोरील व्यक्तीकडे किती पैसे आहे यावरून त्याला आदरपूर्वक वागणूक दिली जाते.

वाढती महागाई बघता एकट्या व्यक्तीने घर सांभाळणं कठिणच होत चाललंय. ज्या कामामुळे आपल्या घरी लक्ष्मी येते त्या कामाचा आदर करायलाच हवा.


Tuesday, September 02, 2025

द्विगुणी रूप

             आपले जग हे फार मोठे आहे. संपूर्ण आयुष्याच्या काळात अनेक लोकांच्या गाठी भेटी होतात, मैत्री होते. प्रत्येकाचा स्वभाव, बोलण्याची शैली, वागणूक ही वेगळी असते. काही लोकांचे बोलणे आपल्याला पटते मात्र काही लोकांविषयी आपल मत हे वेगळं असतं. सगळे आपल्या आयुष्यात मग्न असतात.

              अंतरंग आणि बाह्यरंग असे २ रूप असतात. म्हणतात ना कधी कधी आपल्याला वाटते तशी ती व्यक्ती नसते. मनात वेगळं आणि बाहेर वेगळं. कधी कधी म्हणतात की ही व्यक्ती अगदी नारळाप्रमाणे आहे, आतून गोड आणि बाहेरून कडक म्हणजेच शिस्तीचा. प्रत्येक व्यक्तीची ही २ रुपे असतातच. समाजात वावरताना या गोष्टी लक्षात येतातच. आपण आपल्या आयुष्यात चांगले राहिलो तरी आपल्या विषयी समोरच्या व्यक्तीच वेगळं मत राहू शकते, एकतर ती व्यक्ती खूप जवळची असावी किंवा ती व्यक्ती आपल्याला फार ओळखत नसावी.

              जसे नाण्याला २ बाजू असतात तसेच माणसाच्याही २ बाजू असतात. आपली बाजू ही सर्वांनाच पटेल असेही नाही. त्यामुळे वैचारिक भिन्नता आढळते. सामाजिक वातावरण बघून निर्णय घेणे आवश्यक असते. 

Wednesday, August 27, 2025

दृष्ट नजर

          देशाची विचारांची पातळी खूप घसरत चालली आहे. सरकार आपली तिजोरी भरण्याचे काम करते मात्र सामान्य माणूस एक एक पैशासाठी मर मर राबतो.

          देशात वाढणाऱ्या बलात्काराला आळा घालण्यासाठी खूप उपाय केले जाऊ शकतात पण कोण इतकी मेहनत करणार ? आपल्या मुलीला काही होणार नाही बाकी देशातल्या भगिनींच जे व्हायचं ते होईल असा समज आहे. वर्षानुवर्षे हेच चालत आलंय. कधी कधी वाटत लहानपणी खूपदा पाहिलेल्या नायक चित्रपटात जसा एक दिवसाच्या मुख्यमंत्र्याने न्याय केला ते सर्व आताही होऊ शकत पण करणार कोण ? 

          आज मी नवराष्ट्राचे वर्तमानपत्र वाचत होते. त्याच्या पहिल्या ५०% पानाला एक कंपनीची जाहिरात दिसली. ती होती प्लास्टो कंपनीची. आपली उत्पादने लोकांनी खरेदी करावी यासाठी स्त्रीच्या शरीराचा वापर केला गेला. इतके उत्पादने असताना पण यांना शॉवरचीच मोठी जाहिरात का द्यावी वाटली असेल. शॉवरच्या पाण्याने अंघोळ करणारी स्त्री, वाह रे वाह, ही कमालच ना, इकडे इलेक्शन कमिशन म्हणते आपल्या देशातील स्त्री, बहिणी, भगिनी यांचे मतदान करतानाचे सीसीटीव्ही दाखवणे म्हणजे त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणे, मग आता कुठे गेली ती गोपनीयता. बाईच उघडं शरीर बघून माणसाला आकर्षण वाटत असते आणि त्यामुळे मुले, माणसे यांची स्त्रीविषयची नजर ही वाईट होते. आणि या गोष्टीची भरपाई असहाय्य लहान लेकरांपासून ते वृद्धांपर्यंत असणाऱ्या स्त्रीला करावी लागते. वृद्ध लोकांना नियमित वर्तमानपत्र वाचायची सवय असते. आता त्यांनी सुद्धा हे असे चित्र बघावे का ???? वर्तमानपत्रात असे चित्र टाकून असे उघडे शरीर असणे सामान्य आहे असे दाखवायचे आहे का ? आपली संस्कृती विसरून असे अंग प्रदर्शन करण्याची मुभा या देशातल्या मुलींना संदेश देऊ इच्छिता का ???? 

         काही म्हणतील तुम्हाला पटत नाही तर तुम्ही जाहिरात बघू नका. पण हा काही त्यावर उपाय नाही. चुकीच्या गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. वर्तमानपत्र हे एक माहितीच स्रोत आहे आणि त्यात अशी अश्लीलता दाखवण्यावर बंदी असायला हवी. जेव्हा देशात सक्त कायदे असतील तेव्हाच वारंवार घडणारे दुष्कर्म थांबतील. आता तर काय देशातल्या लोकांचा स्वतःच्या देशाच्या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास सुद्धा उडाला आहे. हीच ती का लोकशाही ?

Sunday, August 24, 2025

निःशब्द संवाद

           आपल्या जीवनात काही असे क्षण येतात जे काहीही न बोलता खूप काही सांगून जातात. त्या क्षणात जे घडले त्याचा प्रत्यय लावणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. काही क्षण हे मनात कायम राहतात. आपल्याला खूप काही करावे वाटते परंतु काही कारणास्तव करता येत नाहीत. तशीच माझी एक आठवण एका जवळच्या व्यक्तीची.....

            निघण्याची वेळ झाली होती, मी तिची भेट घेतली आणि येते म्हणाली तितक्याच तिने घट्ट पकडलेला हात खूप काही सांगून गेला. तिला काहीतरी सांगायचं होतं पण सांगू शकले नाही परंतु मी ओळखले तिला काय म्हणायचे होते. पण घड्याळाचे काटे समोर सरकत होते आणि माझी प्रस्थान करण्याची वेळ झाली होती. प्रवास करते वेळी सुद्धा मी तोच विचार करत राहिले......

              असे काही क्षण न बोलता खूप काही सांगून जातात त्यासाठी मनाला ओळखणे गरजेचे असते. प्रत्येक वेळी  समोरच्या व्यक्तीबद्दलची काळजी ही बोलून न दाखवता वेळ येईल तेव्हा खंबीरपणे आधार देण्याची असते. सहज बोलून दाखवणे आणि प्रत्यक्षात करून दाखवणे यात फार फरक असतो आणि काही वेळेला मनात इच्छा असेल तरीही शांत रहावे लागते.

Saturday, August 16, 2025

Let's Travel

             

          Travelling is where person feels nature, meet new people. It is not only about the destination but the journey you enjoy. Travelling is new experience that has space in our hearts for the memories.It is a way to expand the thinking of our mind, heart and soul and It's not about how much distance is in our journey but cherishing seconds of that moment we enjoy.


At the end of the day what matters is you......





Friday, August 15, 2025

ती एक रात्र 🌌

           उन्हाळ्याचे दिवस होते. हळूहळू सूर्य मावळू लागला होता. दिवसभर उन्हाने तापून निघणाऱ्या गच्चीला थंड करायची वेळ झाली होती. टाकीतून पाणी घेऊन पूर्ण गच्चीवर पाण्याचा वर्षाव केला. पाण्याने गच्ची अगदी गार केली. जेवण आटोपून झोपण्यासाठी गाद्या टाकल्या गेल्या. गप्पा गोष्टीचा खेळ संपला आणि सर्व आपल्या आपल्या जागेवर झोपून एकटक आकाशाकडे पाहत राहिले.......

            निरभ्र आकाश आणि त्यात वाऱ्याची थंड झुळूक मनाला गुदगुल्या करत होती.  निरभ्र आकाशाला प्रकाशाची चाहूल लागली होती. आणि ती प्रकाशाची चाहूल पूर्ण करायला लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी संपूर्ण आकाश न्हाऊन निघाले आणि त्यात इवलीशी उगवती चंद्रकोर आसमंताला ध्यास लावून गेली. हे नयनरम्य दृश्य बघण्यात माझे मन रमले होते. खूप कौतुकाने हे दृश्य डोळ्यात सामावून घेत होती. असंख्य असणाऱ्या चांदण्या मोजण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एकटीने मोजता येणारच नाही त्यामुळे सर्वांना कामी लावले पण मोजणी काही थांबेना. अगणित चांदण्यामध्ये सर्वात जास्त चमकणाऱ्या चांदणीला शोधत होते आणि ती गवसली. पूर्ण गोष्ट लक्षात नाही पण म्हणायचे की आकाशात चांदण्यामध्ये आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि त्या बाजूला ३ चोर दिसतात. आणि खरंच ४ चांदण्या आयताकृतीत दिसल्या आणि त्या बाजूला ३ चांदण्यापण दिसल्या.

             चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून फार कौतुक वाटायचं. आपलं जस जग आहे तसंच, त्या चांदण्या पलीकडे पण एक वेगळं जग असेल का ? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आणि पूर्ण सूर्यमालेचे घटकनिर्मिती कशी झाली असेल ? झाडांची आणि प्राण्यांची निर्मिती कशी झाली असेल ? असे प्रश्न मनात यायचे. लहान असताना आपल मन हे किती साध असतं, आपल्याला जे दिसतं त्याचबद्दल आपण साधेपणाने विचार करत असतो. 
              
               आज आधुनिक काळात प्रत्येक गोष्टीच विज्ञान असेल तरीही मला निसर्गाच्या या गोष्टीचं आजही नवलच वाटत. पण आजकाल चांदण्या दिसतातच कुठे ? समोरच्या पिढीला चांदण्या दाखवायच्या तरी कश्या ? आपण निसर्गाची निगा नाही राखली तर निसर्ग सुद्धा आपली निगा करणार नाही. वाढती लोकसंख्या, वाढत प्रदूषण, तापमानवाढ, जंगलतोड इत्यादि गोष्टी निसर्गाला हानी पोहचवत आहेत. म्हणून निसर्गाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी समजून आपल कर्तव्य सर्वांनी पार पाडायला पाहिजेच.


Thursday, August 14, 2025

जीवन हे क्षणभंगुर

खुदकी खामिया देखते देखते, खुदको ना खो देना
सबकी मंजिले अलग अलग, किसीकी ईर्ष्या ना करना


               प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. कोणाला जन्मजात सर्व मिळत असते तर कोणाला ते सर्व मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. समोरच्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपल्याकडे नाही याची नाराजी प्रत्येक व्यक्तीला होतेच हा निसर्गाचा नियम आहे. कोणाला लवकर यश मिळते तर कोणाला उशिरा मिळते. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपण स्वतःची तुलना ही समोरच्या व्यक्ती सोबत करतो. त्या भौतिक, मानसिक गरजाही असू शकतात. तुलना करता करता आपण स्वतःला कमी समजायला लागतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या करू लागतो. 

          आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून जीवन जगण्याला अर्थ आहे. आजच्या आधुनिक काळात पैसा, गाडी, बंगला, नाव, नोकरी या गोष्टींना माणुसकीपेक्षा मोठा दर्जा दिला जातो आहे. कितीही काळ गेले तरी ज्या व्यक्तीत माणुसकी आहे तोच देवाला प्रिय असतो. 

          आपल्या परिस्थितीची माणसाने नेहमी जाण ठेवावी आणि समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीची थट्टा करू नये. सर्व गोष्टी या आदराने घ्याव्या. त्यातच आपली खरी माणुसकी दिसून येते. आपण स्वतः स्वकष्टाने, मेहनतीने कस मोठं होऊ याचा विचार करू समोरचे पाऊल टाकावे.

Saturday, June 28, 2025

कन्यारत्न

       मुलगी होणे म्हणजे माता पित्यांसाठी वरदान आहे आणि जीवनातील सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान आहे. ज्या माता पित्याला कन्यारत्न प्राप्त होते, त्यांनाच हे दान करण्याचे पुण्य मिळत असते. कन्यादान हे म्हणजे लग्नातील एक विधी. संपूर्ण जीवन जवळ असणारी आपली मुलगी आता दुसऱ्या घरी वास्तव्य करणार, सासरी आपल नवीन जग निर्माण करणार या भावनेने व्याकुळ असले तरीही मुलीचे लग्न हे योग्य वयात होणे हे गरजेचे आहे.

           जस व्यक्तीच शिक्षणाचं, नोकरीच एक वय असतं तसंच लग्नाचं वय पण असतं. वेळेत लग्न झाल्यास समोरील आयुष्य कस जगायचं, समोरील आपले नोकरी विषयक निर्णय कसे घ्यायचे, कुटुंब नियोजन कसे करावे हे प्रश्न नवीन पिढी समोर उभे राहतात.

           कोवळ्या वयात असणार चेहऱ्यावरच तेज हे कमी होत जात. आज स्त्री आणि पुरुष हे जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असले तरीही एक गोष्ट अशी आहे जी फक्त स्त्री करू शकते ती म्हणजे बाळंत होणे आणि ही एक स्त्री जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया एका विशिष्ट काळापर्यंत होत असते. लग्नाला उशीर झाल्यास या गोष्टीच नुकसान या नैसर्गिक प्रक्रियेत होते. आणि यामुळे त्या स्त्रीला वेदना सहन कराव्या लागतात. बाईच बाईपण हे खर याच प्रक्रियेमुळे होते. 

           जस शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची ओढ लागते तशीच नोकरी मधे स्थिर झाल्यावर लग्नाची ओढ लागते. आपण ही एक नवीन बंधनात बांधले जावे. जे प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो आनंदोत्सव सारखा पार पाडावा हीच इच्छा असते. नवीन कुटुंबाने आपल्याला आपलेसे करावे आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीत साथ देणारा साथीदार हा प्रामाणिक, निर्व्यसनी, चांगली वागणूक, जबाबदारी सांभाळणारा आणि काळजी घेणारा असावा असच वाटते. 

           लग्नाचे वय झाल्यास मुलीच्या मनात खूप विचार येत असतात. त्या विचारांना बोलण्याची संधी मात्र मिळत नाही पण हा संवाद प्रत्येक घरी व्हायला हवाच. शिक्षण घेतल्यावर सुद्धा बाकीना नोकऱ्या मिळाल्या पण मला नाही मिळाली याची खंत आणि मनात तळमळ असते तसंच आपल्या बरोबरील सर्व संसारात मग्न पण आपण मात्र नोकरी आणि नोकरीच करत आहोत या भावनेने मनाला खंत वाटते आणि मन खायला उठते.

       लोकांकडे बघून जगणे असा संदेश नाहीच पण जीवन हे एकदाच मिळते आणि त्या जीवनात आपण आपल्याला मनातून वाटणाऱ्या गोष्टी केल्यास त्याचा आनंद हा द्विगुणित होतो. शेवटी तात्पर्य हेच की मुलीच्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ द्यावे, शेवटी संसार हा तिलाच करायचा असतो.

Sunday, May 04, 2025

आकाशातले मोती

            निसर्ग हा किती निराळा आहे. निसर्गाचं प्रत्येक रूप हे माणसाच्या जीवनाशी निगडित असतं. निसर्गाचं वेगळं रूप, वेगळे रंग, त्यातून दरवळणारा सुगंध, आश्चर्यचकित करणारं दृश्य, मनाला तृप्त करणारं आणि डोळ्यांना सुखद अनुभव देणार एक रहस्यमय,अद्भुत देवाची निर्मिती.

           मनाला वेड लावलं तर निसर्गाचे बदल हे नक्कीच जादूचे प्रयोग वाटतील. एकीकडे पृथ्वीला प्रकाशमय करणारा सूर्य आणि दुसरीकडे टपोऱ्या पावसाचे थेंब आणि गारा. आजही पाऊस आला की त्यात भिजावे वाटते, पावसाचा आनंद घ्यावा वाटतो, नाचावे वाटते, पेपर ची होडी करून पाण्यावर तरंगवावी वाटते, लहान मुलाप्रमाणे अल्लडपणा करावा वाटतो. निसर्ग गोष्टच अशी आहे की मनाला मोहून टाकते, प्रत्येकाला प्रेमात पाडेल असा हा पाऊस पृथ्वीला जस गार करतो तस मनाला वेगळ्या भावना सोबत जोडतो.

           प्रत्येक गोष्टीचं विज्ञान जरी माहीत असलं तरीही अल्लड बनून प्रत्येक क्षण साजरा करण्याला वेगळाच आनंद असतो. चक्क उन कडाडणाऱ्या मे महिन्यात आकाशातून पडलेल्या थंडगार गारा हातात पकडता पकडता पाण्यात रूपांतर झाल्या. 

                  त्या गारा सुद्धा काही वेळ साठीच गारा असतात पण नंतर ते पाणी होत, गारा पडल्या की सर्वांना नवल वाटत पण गारांच अस्तित्व मूळ हे पाणीच. अगदी मोत्याप्रमाने दिसत आहे पण वेळ गेल्यावर हातात काहीच उरत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची इच्छा असावी. मन आनंदी असल्यास मोठ संकट सुद्धा दूर करण्याची ताकद येते.


   

Sunday, April 20, 2025

मराठीचे भवितव्य : आपली जबाबदारी

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा

           या गीताला आपल्या महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून राज्यसरकारने घोषित केले. आपल्या देशात २२ भाषा प्रचलित आहेत. त्यापैकी महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी. 

               आताच्या काळात इंग्रजीचं इतक वर्चस्व वाढलंय की  लोकांना मराठी बोलताना मध्येच इंग्रजी शब्द बोलायची सवय झाली आहे. म्हणजे ना पूर्ण मराठी ना पूर्ण इंग्रजी. नक्कीच इंग्रजी ही काळाची गरज आहे पण आपली मातृभाषा टिकून राहणे हे आपलीच जबाबदारी. समोरच्या पिढीला मराठीचं महत्त्व कळाव यासाठी आपली मातृभाषेत बोलणे हे गरजेचे आहे.

          एक दिवस मेट्रो ने प्रवास करते वेळी रांगेत उभ न राहता समोर समोर करणाऱ्या व्यक्तीला मी म्हणाले " आपको लाईन नही दिख रही क्या ? बीच में कैसे आ रहे हो ?
हे वाक्य विचार न करता तोंडून निघून गेले. पण लगेच विचार आला मी हिंदीत का बोलले, आपली भाषा मराठी आहे तर मराठीतच शब्द निघायला हवे होते. माझी हिंदी इतकी स्पष्ट नाही पण मराठी बोलताना गोडवा वाटतो.

                नोकरी मुळे इंग्रजीचा पगडा वाढलाय आणि प्रत्येकाला मराठी कळत नाही त्यामुळे हिंदीचा वापर वाढलाय.. तरीही एखादी गोष्ट व्यक्त करायला आपली मातृभाषाच गोड वाटते. मराठी असल्याचा गर्व वाटतो आणि शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा आदर वाटतो.

               प्रत्येकाला प्रत्येक भाषेचा आदर असावा. भाषेची सक्ती नको पण थोडीफार दुसरी भाषा ही शिकण्याची आवड असावी. भारतात अनेक ठिकाणी भाषेमुळे वाद होत असताना आपल्याला दिसतात पण ते वाद न करता समजूतदारपणे प्रश्न कसा सोडवावा याकडे बघितले पाहिजे. भाषेचा अनादर करणे म्हणजे त्या मातृभूमीचा अनादर करणे होय. शेवटी भारत हा सर्वांचा देश आहे.

Sunday, April 13, 2025

लहानपण देगा देवा

            या वयात आलेल्या आयुष्यात, नोकरीच्या दगदगित वाटत लहान असताना सर्व किती छान होत... ना कसल बंधन ना ताणतणाव.... फक्त मनसोक्त आनंद.

          व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. मेंदूच्या विकासासहीत विचार करण्याची क्षमताही वाढत असते. लहान असताना संपूर्ण जग हे एका बागे सारखं वाटतं, सुंदर फुले, हिरवेगार झाडे, खेळण्यासाठी अनेक झूले इत्यादी. प्रत्येक व्यक्ती हा चांगला आहे अस वाटते. अभ्यास, शिक्षण, शाळा, आणि खेळ या व्यतिरिक्त मनात काहीही नसते. ते म्हणतात ना मुले ही देवाघरची फुले.

              सर्वांना आपलंसं करून टाकणारी, मनात कुठलाही द्वेष न ठेवणारी, सर्वांचं मनापासून एकणारी गोंडस मुले. आणि आज तीच मुले मोठे होत असताना विचार करतात.... लहानपणी सर्व चांगलच वाटत का तर आपल्यात ती समज नसते. एकदा समज आली की  समोरील व्यक्ती आपल्यासाठी धोकादायक असू शकते हे समजते...आज सतत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बातम्या कानी एकु येतात आणि मन सुन्न होतं, कदाचित या सर्व गोष्टी आपण लहान होतो तेव्हा पण होतच असतील पण त्या गोष्टीचा सुगावा लागायचा नाही म्हणूनच जग हे बागेसारख वाटायचं पण आता कळलं जितकं सर्व छान दिसते ते नसते म्हणजेच दिसते तस नसते.

लहानपण परत येणं तर अशक्यच आहे पण आपल्यातलं लहानपण आपणच जपून ठेवायला हवं.

Sunday, March 02, 2025

अश्रू

कधी कधी मनमोकळेपणाने रडावे
मनातल्या वेदना अश्रू वाटे बाहेर पडावे

रडणं ही कमकुवत मनाची निशाणी नसून
भावनांना  फुटलेला पाझर असावा

नदीचं पाणी संथगतीने वाहते तसच
डोळ्यातलं पाणी हे टपोऱ्या पावसाचे थेंब जणू

मनाला दिलासा मिळाला तरीही
पाणावलेले डोळे खुप काही सांगतात

Sunday, November 24, 2024

वय आणि समजूतदारपणा

                 समाजाचा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावर होतो. लहानपणापासून वयात येत पर्यंत सभोवताल घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करत असतो. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ती वेळ यावी लागते. 

                   कानांनी एकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतः बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नवा नव्हेच. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच वयात कळेल अस होत नाही. वयात आल्यावर ती गोष्ट आपोआप आत्मसात केल्या जाते, त्यासाठी सल्ल्याची गरज भासत नसते. जेव्हा व्यक्तीला परिपक्वता येते तेव्हा समज येते, काही गोष्टीबद्दलचा समज हा बदलू शकतो. आपण भूतकाळात विचार केला तो चुकीचा होता हे सुद्धा प्राप्त होऊ शकते.

                आजच्या काळात विचारांने समृद्ध असणे फार गरजेचे आहे. योग्य समज येणे ही काळाची गरज आहे. भूतकाळात आपले काही विचार असतील पण त्याच मुद्द्यांवर आता वर्तमानकाळात वेगळे विचार असू शकतात. काळानुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे.


Sunday, November 17, 2024

असच काही

           नात्यामधले वाद हे अमावस्याच्या रात्री सारखे असतात. अमावस्येला सगळीकडे काळोख अंधार असतो. रोज आसमंत प्रकाशित करणारा चंद्र दिसत नसतो. अमावस्या संपली की हळू हळू चंद्राचं नवीन रूप पाहायला मिळते. दररोज चंद्र कलेनी वाढत जातो आणि मन ओढून घेणारी पौर्णिमेची रात्र येते. पौर्णिमेचा चंद्र बघून मनाला शांत वाटते. कवीच्या मनात घर करतो. 

           अश्याचप्रकारे मैत्रीमध्ये वाद झाले की मन उदास होते पण प्रेमापोटी वाद विसरून एकत्र येणे हे पौर्णिमेच्या रात्री सारखे असते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नात्यामध्ये एक वेगळं तेज निर्माण होते आणि रागावणाऱ्या चेहऱ्यावर आनंदाचे बोल असतात अशीच ही वळण त्या मैत्रीला पुन्हा घट्ट करून जातात.

Sunday, November 03, 2024

मैत्रीण कशी असावी....

एक तरी मैत्रीण अशी असावी
हाक मारताच ती जवळ असावी

महिन्यांनी भेटली तरी नात तेच असावं
प्रेम आणि जिव्हाळा मनापासून असावं

ना सोशल मीडियाचा रोग असावा
ना मैत्रीचा दिखावा असावा

कायम मैत्रीतील प्रेम असावं 
मन भेटण्यासाठी आतुर असावं


चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...