Friday, August 15, 2025

ती एक रात्र 🌌

           उन्हाळ्याचे दिवस होते. हळूहळू सूर्य मावळू लागला होता. दिवसभर उन्हाने तापून निघणाऱ्या गच्चीला थंड करायची वेळ झाली होती. टाकीतून पाणी घेऊन पूर्ण गच्चीवर पाण्याचा वर्षाव केला. पाण्याने गच्ची अगदी गार केली. जेवण आटोपून झोपण्यासाठी गाद्या टाकल्या गेल्या. गप्पा गोष्टीचा खेळ संपला आणि सर्व आपल्या आपल्या जागेवर झोपून एकटक आकाशाकडे पाहत राहिले.......

            निरभ्र आकाश आणि त्यात वाऱ्याची थंड झुळूक मनाला गुदगुल्या करत होती.  निरभ्र आकाशाला प्रकाशाची चाहूल लागली होती. आणि ती प्रकाशाची चाहूल पूर्ण करायला लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी संपूर्ण आकाश न्हाऊन निघाले आणि त्यात इवलीशी उगवती चंद्रकोर आसमंताला ध्यास लावून गेली. हे नयनरम्य दृश्य बघण्यात माझे मन रमले होते. खूप कौतुकाने हे दृश्य डोळ्यात सामावून घेत होती. असंख्य असणाऱ्या चांदण्या मोजण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एकटीने मोजता येणारच नाही त्यामुळे सर्वांना कामी लावले पण मोजणी काही थांबेना. अगणित चांदण्यामध्ये सर्वात जास्त चमकणाऱ्या चांदणीला शोधत होते आणि ती गवसली. पूर्ण गोष्ट लक्षात नाही पण म्हणायचे की आकाशात चांदण्यामध्ये आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि त्या बाजूला ३ चोर दिसतात. आणि खरंच ४ चांदण्या आयताकृतीत दिसल्या आणि त्या बाजूला ३ चांदण्यापण दिसल्या.

             चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून फार कौतुक वाटायचं. आपलं जस जग आहे तसंच, त्या चांदण्या पलीकडे पण एक वेगळं जग असेल का ? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आणि पूर्ण सूर्यमालेचे घटकनिर्मिती कशी झाली असेल ? झाडांची आणि प्राण्यांची निर्मिती कशी झाली असेल ? असे प्रश्न मनात यायचे. लहान असताना आपल मन हे किती साध असतं, आपल्याला जे दिसतं त्याचबद्दल आपण साधेपणाने विचार करत असतो. 
              
               आज आधुनिक काळात प्रत्येक गोष्टीच विज्ञान असेल तरीही मला निसर्गाच्या या गोष्टीचं आजही नवलच वाटत. पण आजकाल चांदण्या दिसतातच कुठे ? समोरच्या पिढीला चांदण्या दाखवायच्या तरी कश्या ? आपण निसर्गाची निगा नाही राखली तर निसर्ग सुद्धा आपली निगा करणार नाही. वाढती लोकसंख्या, वाढत प्रदूषण, तापमानवाढ, जंगलतोड इत्यादि गोष्टी निसर्गाला हानी पोहचवत आहेत. म्हणून निसर्गाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी समजून आपल कर्तव्य सर्वांनी पार पाडायला पाहिजेच.


1 comment:

Anonymous said...

Khup chan lihites. Keep it up

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...