Wednesday, August 14, 2024

खरचं देश स्वतंत्र झाला काय ?

                 आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले. मुलीला हातात घेऊन बाबाचा आनंद गगनात मावेना, आईने ९ महिने पोटात वाढलेल्या बाळाला कुशीत घेतल तेव्हा उर दाटून आला.

                   मुलीच्या रुपात साक्षात लक्ष्मीने जन्म घेतला, मुलीचा पायगुण घराला लागला. घराची भरभराट झाली. ते कुटुंब फार आनंदी होत. मुलगी जशी मोठी होऊ लागली तसे आईबाबा तिचे लाड पुरवत गेले, तिच्या स्वप्नांसाठी ते झटत राहिले. आपली मुलगी शिकून खूप मोठी व्हावी, आपलं नाव तिने मोठे करावे हीच इच्छा बाळगत ते मुलीला शिक्षणासाठी दूर पाठवू लागले. मुलगी पण तशीच जिद्दी, चिकाटी वृत्तीची, तिने आपल्या स्वप्नांना पंख दिले, खूप मेहनत घेतली. आपल्या आई बाबाच नाव मोठं करण्यासाठी ती कष्ट घेत राहिली.

                नियमितपणे रोजची कामे करत असताना अचानक घरच्यांना फोन येतो, तुमच्या मुलीने आत्महत्या केली. नेहमी सारखे आनंदात जगण्याऱ्या कुटुंबाला राक्षसाची नजर लागली. जिवाचे हाल करून मोठ केलेल्या मुलीच्या बाबतीत ही घटना एकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही समजेना, काही सुचेना, काय झालं असेल ते ही कळेना. गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपणाऱ्या मुलीला त्या आई वडिलांनी आपल्या मुलीला मृत अवस्थेत बघितलं, रक्तबंबाळ शरीर, अस्त्यावस्त असलेलं निर्वस्त्र शरीर. दोघांचं काळीज चिरून उठलं.  दोघांचा आक्रोश आसमंतात पोहचला.

            त्या मुलीची अशी अवस्था का झाली ? तिने अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले होते ? रात्रीच्या वेळी ती आपली नोकरी करत होती ? स्वतःसाठी नाहीतर दुसऱ्या जीवांना जपत होती ? ती कामाच्या जागी एका हॉल मध्ये आराम करत होती ? काय होती तिची चुकी ?

               जिवाचे रान करून अभ्यास करून शिक्षण घेतल ? स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी झटत होती ? कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित असणार हा विचार करत होती ? या होत्या तिच्या चुका ?

                मुलींनी बलात्काराच्या भीती पोटी घरीच बसायचं का ? शिक्षण घेऊन पण घरचीच कामे करायची का ? आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आकाशात घेतलेली झेप थांबवायची का ?

               चूक करणाऱ्या पेक्षा चुकीच्या गोष्टीबद्दल मौन राहणे हे जास्त अपराधी आहे. सतत घडणाऱ्या गोष्टींना आळा घालणं हे जास्त महत्त्वाचं वाटते. प्रत्येक दिवसाला काही न काही नवीन धक्कादायक बातम्या समोरच येतात पण न्यायाच काय ? आरोपी लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व कधी थांबणार ? कधी हा देश बलात्कार मुक्त होणार ? या अश्या राक्षस वृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नकोच.

        भारत भूमी ही संतांची भूमी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, थोर महापुरुष, राजे, महाराजे यांनी स्व मेहनतीवर स्वराज्य निर्माण केले. त्याच भूमीवर अश्याप्रकरचे दुष्कर्म थांबत नाहीत हे बघून मनाला अत्यंत दुःख वाटते. सर्वांनी एकमेकांना जपा, अस कृत्य कोणासोबत घडू नये..... बाकी काय अजून समोर खूप काही बघायचचं आहे..........


हा देश माझा याचे भान,
जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या
अभिलाषा यांची धरिता
कुणी नजर वाकडी करिता
त्या मरण द्यावया,
स्फुरण आपुले बाहु पाऊ द्या रे ॥


Sunday, August 04, 2024

न संपणारं दुःख

                माणसांच्या जीवनात भावनांच चक्र सुरू असते. कधी चेहऱ्यावरचं गोड हसू, कधी क्षणात आलेला राग, कधी डोळ्यातून वाहलेले अश्रू तर कधी मनातल्या मनात साठवलेली भावना.

                सुख सर्वानाच हवं असते. माणसाला सुखात राहावं वाटते. पण हे सुख कायम असेल अस नसतेच. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार होतच असते. सुखाबद्दल नेहमी बोलले जाते पण दुःखाचं काय ?

                दुःखात माणूस हताश होतो, नैराश्यात जातो, मानसिकरीत्या दुबळा बनतो, आणि या संकटांतून सावरायला फार काळ लागतो. नियतीने प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे. ज्याने या धरणीवर जन्म घेतला तो एक ना एक दिवस अनंतात विलन होणारच हा निसर्गाचा नियमच आहे.

              आपल्या जीवनात आपण आपल्याकडे असणाऱ्या आधारामुळे जीवन जगत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे जीव लावणारी माणसं असतातच. आपल्यासोबत आपली जवळची व्यक्ती आहे याचं समाधान असते. पण काही कारणास्तव ती व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्यास होणारा त्रास हा असहनीय असतो. ज्या व्यक्तीला डोळ्यादेखत आपण बघतो, बोलतो ती व्यक्ती एक दिवस कायम आपल्याला सोडून जाते यातून मनाला लागणारा धक्का अविश्वसनीय असतो. यापेक्षा कोणतेही दुख मोठे नाही.

              जरी हे सर्व आपल्यासोबत घडू नये याची मनात धारणा ठेवली तरी, हे दुःख कोणापासूनही वंचित नाहीच. आज काय घडेल किंवा उद्या काय घडेल याची शाश्वती नाही.

Sunday, July 21, 2024

बंधन

           लहान असताना मोठ लवकर व्हावं अस वाटते आणि मोठ झाल्यावर वाटते अजून बालपणात जगावं. बालपणातील निरागसपणा, जबाबदारी मुक्त, मजेत असणार लहान मूल परत व्हावंसं वाटते.  जसं जसं मोठं होत असतो तस अनेक गोष्टीचं वजन वाढत जाते. प्रत्येक गोष्ट मनासारखी करता यायची पण आता असा काळ आला आपण एखादी गोष्टी बरोबर करत आहो की नाही याची तपासणी करावी लागते.

            लहान असताना आपला जीवनक्रम अगदी ताण मुक्त होता पण आता रोजच्या दिनचर्येत वापरत असणाऱ्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो, अंघोळीसाठी साठी साबण कोणता वापरावं, केस धुवायला कोणता शाम्पू चांगला असेल ज्यामुळे केसांची काळजी घेता येईल, तेल कोणतं वापरायचं, टूथपेस्ट कोणती वापरावी, 
रोज पाणी किती प्यावे, कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले आहे आणि कोणते घातक आहे, जेवताना जास्त पाणी पियू नये, फळ पण वेळेतच खावी  इत्यादी.....

          बापरे ! कितीही चिंता, काही नवीन वस्तू घ्यायचा विचार झाला तरी १० वेळा विचार करावा लागतो, आपल्यासाठी कोणती वस्तू योग्य असेल. समोरच्या दिवसाचं दिनक्रम आधल्या दिवशी करावं लागतं.
म्हणून वय जसं जसं मोठ होत तसं तसं विचार करण्याची क्षमता वाढत जाते आणि मेंदूमध्ये प्रश्नावली तयार होते. आणि यामुळे अती विचारांची समस्या उद्भवू लागते. हातात पैसा जसा येत जातो तश्या माणसाच्या गरजा वाढत जातात.

              या धावत्या युगात साधं राहणीमान लोप पावत असल्याचे दिसून येते. जे आयुष्य आपण लहान असताना जगलो ते आयुष्य आताच्या पिढीला जगता येत नाहीच. आताच्या पिढीच काहीतरी नवीनच असतं. जितका कमी विचार तितके लवकर प्रश्न सुटतील आणि अतिविचारांची, बंधन असल्याची काळजी मिटेल.

Sunday, July 14, 2024

भेटला विठ्ठल माझा 🌸

                प्रत्येक धर्मात अनेक देव आहेत. त्या देवांची पूजा अर्चना केली जाते. भक्ताला देवाने दर्शन द्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संकटात देवाने आपल्याला मदत करावी असे प्रत्येकाला वाटत असते. देवाने स्वयंभू आपल्याला आशीर्वाद द्यावा अस वाटत असते. त्यासाठी फक्त भक्ती करून होत नाही, त्यासाठी आपले आचरण हे देवांच्या शिकवण प्रमाणे असायला हवे. अर्थात देव आहे आपल्या हृदयात असतो, आपण चुकीचं कार्य केल्यास देवाचं आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
            रोजच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला नियम पाळावे लागतात. दुपारच्या वेळेला ट्रॅफिक नसले तरीही १ मिनिटांसाठी सिग्नल वर थांबल्याने मागून येणारे वाहने सुद्धा थांबतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे. प्रत्येकाची मानसिकता नसतेच, ते नियम न पाळता नियमांच उल्लंघन करतात. आपण आपल्या नियमांवर ठाम राहल्यास समोरच्या व्यक्तीला सुद्धा नियमांची कठोरता कळते. अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्यास आपल्याला ही मदत मिळतेच. शुद्ध मन, विचार, आचरण असल्यास देव सतत आपल्या हृदयात विराजमान असतात.

           एकमेकांना मदत केल्यास माणुसकी टिकून राहते. देव कोणत्या रुपात येऊन तुम्हाला मदत करेल हे कळणार पण नाही. त्यामुळे चांगले कर्म करत राहिल्याने त्या कर्माचे गोड फळ मिळतेच.

Sunday, June 16, 2024

सुखदायक वेदना ❤️

              वेदना या कोणत्याही प्रकारात मोडल्या जाऊ शकतात. शरीराला झालेल्या दुखापतीमुळे होणारी वेदना, मनाच्या विरुद्ध गोष्टीमुळे मनाला होणारी वेदना आणि आपल एक काम पूर्ण होत असलेल्यांची एक उल्हासदायी वेदना, आता हे वेदना उल्हासदायी खरच असू शकते का ?

          उल्हास म्हणजे आनंद आणि उल्हासदायी वेदना म्हणजे वेदना होऊन सुद्धा मिळणारा आनंद. एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता मेंदूचा किंवा शरीराचा वापर होतो. एखादी गोष्ट मनात ठरवून ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही अश्याप्रकरच्या खूप गोष्टी असतात, त्यापैकी एक माझी आवड म्हणजे चित्रकला.

             हातात घेतलेली चित्रकला पूर्ण होत पर्यंत माझ मन शांत नसते. हातात पेन्सिल घेण्यापासून ते शेवटचं रंगकाम करून पाण्यात ठेवलेला ब्रश, इतक्या काळात वेळेचं भान नसते, भूक लागली हे सुद्धा कळत नाही, बाकी काम राहील बाजूला पण चित्र पूर्ण होत पर्यंत मी त्या चित्रात गुंतले असते.

            एक चित्र काढायला, रंगवायला साधारण ३ ते ४ तास लागतातच. हा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि त्यात सतत बसून काम करणे, त्यामुळे पाठ दुखू लागते, बारीक काम असेल तर हात सुद्धा दुखून येतो. एकदाच चित्र पूर्ण झालं की शरीराला आराम दिल्यावर मिळणार समाधान खूप वेगळ असते.

            शरीरात वेदना झाल्या असतील तरीही त्यापेक्षा चित्र पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो त्यामुळेच याला उल्हासदायी वेदना म्हणतात. एखादी गोष्टीची मनापासून आवड असल्यास ती पूर्ण होत पर्यंत सतत प्रयत्न केल्यास मिळणाऱ्या फळाची चव गोडच लागते. ती कला असो वा गिर्यारोहण असो किंवा आपले छंद.......

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...