Sunday, June 02, 2024

चालतं बोलतं जीवन

                सर्वांच्या जीवनात संघर्ष असतोच. आपल्या जीवनाची दुसऱ्याच्या जीवनाशी तुलना होऊ शकत नाही. सर्वांच्या जीवनात वेगळे प्राधान्य असते, स्वतःचे समस्या असतात आणि त्यावर स्वतःचे उपायपण असतात. सर्वांसाठी जीवन हे सारखे नसते. जीवनात घडून गेलेल्या गोष्टींमधून शिकवण घेऊन समोर पाऊलवाट करणे हे महत्त्वाचे ठरते. परिपक्वता ही वयामुळे येत नसते ती अनुभवातून येते. नक्की परिपक्वता म्हणजे काय ? जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवताली काय घडते आहे याबद्दल जागरूक असता, जेव्हा तुम्हाला माहित असते काय बरोबर आहे काय चूक आहे, जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या चांगल्या साठी विचार करत असते.

              आतापर्यंत जीवनात अनेक अडचणी आल्या, चढ उतार आले. नेहमी अभ्यासात मग्न होऊन कायम टॉप करणारी मुलगी ते जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत , नवीन गोष्टी आत्मसात करणारी मी एक पूर्णपणे नाही पण स्वतंत्र स्त्री बनली आहे, आणि हा प्रवास घाटात असणाऱ्या वळणांप्रमाने होता.

                जीवन जगताना मिळालेली शिकवण मी ह्या ब्लॉगमध्ये लिहिते आहे. एक न एक दिवस सर्व ठीक होईल हे अनुभवातून शिकायला मिळाले. देवाचं सगळीकडे लक्ष असते, आपण काय क्रिया, प्रतिक्रिया करतो हे सर्व देवाला ठाऊक असते. आपण आज जरी एखाद्या गोष्टीवरून काळजी करत असू ती एक दिवस नक्कीच काळजी मिटेल. प्रत्येक वेळेस आपले निर्णय बरोबर असतीलच असे नाही कधी ते चुकतात पण तीच चूक आपल्या हातून घडली हे मान्य करणे आणि तीच चूक परत न करणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

             एक मुलगी म्हणून प्रत्येक क्षणाला स्वतःला सावध ठेवणे खूप गरजेचे आहे.  सार्वजनिक ठिकाणी वावरताना क्षुद्र लोक आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, वेळ काय झाली असे प्रकारचे प्रश्न विचारतात या गोष्टींना बळी न पडता तिथून काढता पाय घेऊन सावध राहण्यात जबाबदारी आहे. 

                प्रत्येक गोष्टीला होकार द्यालाच हवा अस काही नसते. नकार द्यायला पण शिकायला पाहिजे. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्याला नकार देताना विचार करावा लागतो पण आपण स्वतःला महत्त्व द्यायला पाहिजे आणि आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीला सरळ नकार देता आला पाहिजे. सर्वांच्या मदतीला आपण धावून जायचं पण आपल्या मदतीला कोणी नाही असं नको व्हायला.

              कधी कधी मनात विचार येतो ४ वर्षापूर्वी सोशल मीडिया न वापरण्याचा निर्णय हा सर्वात अचूक होता. सोशल मीडिया हे एक जाळं आहे. तरुण पिढीसाठी हे एक व्यसन होत चाललंय. तास न तास कसे चालले जातात याच भान राहत नाही. एखाद्या व्यक्तीची चांगली पोस्ट बघितल्यास आपलं जीवन अस का नाही ? किंवा मी त्या व्यक्तीसारखी का नाही ? हे विचार करून मनात मत्सर निर्माण होतो. हे सर्व थांबायला हवं. सर्वांना एक अमूल्य जीवन मिळालेलं आहे. आपल्या अमूल्य वेळेला या सोशल मीडियाच्या नादात वाया घालवता कामा नये.

          डोळे बंद करा आणि कल्पना करा तुम्हाला काय करावं वाटते मी पण केलं, माझं ह्रदय म्हणालं तू चित्र काढ मी काढलं नंतर परत कल्पना केली , माझं ह्रदय म्हणालं तुझ्या आयुष्यात तू रंगबेरंगी रंग भर, मी रंगकाम केलं. मी परत कल्पना केली, माझं ह्रदय म्हणालं तू एक वाद्य शिकायला पाहिजे आणि मी शिकायला सुरुवात केली. मी परत कल्पना केली माझं हृदय म्हणालं तू नाच, तू गाणं म्हण, तू स्वयंपाक कर, तू भरतकाम कर...... आणि मी माझ्या हृदयाचं ऐकत सर्वच केलं.

           मी हे सर्व केलं कारण मला करायचं होत, माझी आवड आहे, त्यातून मला खूप आनंद आणि समाधान मिळते. माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता २ वर्षात ६३ ब्लॉग्ज मार्फत वेगळे वेगळे विचार मांडण्यात आले. 
 
           देवा, इतक्या अडचणी का आहेत माझ्या जीवनात ? असा प्रश्न केल्यास उत्तर काय असेल ? देव म्हणतात तू जर रात्रीचा अंधार बघितला नाही तर तुला सूर्याचं महत्त्व कस कळेल तसच जीवनात अडचणी आल्या नाही तर तुझ्या जीवनातील सुखाच्या क्षणात आनंद कसा मिळणार. त्यामुळे प्रत्येकाला आपली सुख दुःख सांभाळून जीवन जगावे लागते.

        अर्थात कितीही बिकट परिस्तिथीला मात करण्यासाठी जिद्द, कसोटी असावी लागते, ताण तणाव न घेता आनंदाने जीवन जगण्यात काही वेगळीच मजा आहे.




Tuesday, May 21, 2024

निःशब्द

                आजच्या काळात ताण तणाव वाढत चाललेला दिसतो.  दररोजच्या चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली, त्या बातम्या वाचता वाचता मन दुखत, प्रत्येक दिवसाला बातम्यांमध्ये अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून प्रकरण, जंगली प्राण्यांचा हल्ला, दुर्घटना, अपघात इत्यादी प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. हे असं सर्व वाचून मन खूप दुखावलं जातं,  देवाने इतक्या सुंदर सृष्टीची निर्मिती केली आणि आजचा माणूस खरचं माणसाप्रमाणे वागत आहे का ?

                 लोकांची मानसिकता माणसाप्रमाणे का राहिली नाही ? हे सर्व पाप करून काय सिद्ध करतात ? या चुकीच्या गोष्टी करून काय समाधान मिळते ?  निसर्गाचा, माणुसकीचा का विनाश करू पाहत आहे ?

               हे सर्व प्रश्न रोजच पडतात. लोकसंख्या जास्त, वेगळे विचार असणाऱ्या लोकांची संख्या जास्त, इतक्या लोकसंख्येला नियंत्रित करणं साधं सोपं नाही पण अस्या घटना देशाला काळीमा फासतात, गुन्हेगाराला त्याच्या चुकीची शिक्षा मिळत नसेल तर ही खरचं न्यायव्यवस्थेची लाजेची गोष्ट आहे.

            मणिपूर दंगे, लडाख आंदोलन, बिल्कीस बानो केस, प्रज्वल रेवांना केस, नुकतच पुणे मध्ये अपघात झाल्याचं प्रकरण, गुन्हेगाराला शिक्षा मध्ये काय तर निबंध ? खरचं २ निष्पाप जीवाची हत्या केलेल्या गुन्हेगार पैसे वाल्याचा मुलगा म्हणून त्यात शिक्षा म्हणून निबंध, वा रे वा कमालच झाली. घाटकोपर इथे होर्डींग पडल्यामुळे मृत पावलेल्या कुटुंबांनी काय करायचं ? आणि त्यांच्या जीवाची किंमत किती तर ५ लाख, वा रे वा सरकार ,  स्वप्नील लोणकरची आत्महत्या, निर्भया कांड, डॉक्टर च्या निष्काळजीमुळे मृत्यू.

           हेच दिवस बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस भारताचे संविधान लिहिण्यात वेळ दिला ?
हे काही मोजकेच मुद्दे असे दररोज कितीतरी भयानक गोष्टी घडत आहेत. आणि सामान्य जनतेचे हाल होत आहेत.

             लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांची व लोकांसाठी चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे फक्त देशाचे नोकर आहे, जनतेचे सेवक आहे. पण काही माज असलेल्यांना वाटते की आपल्यापुढे मोठे कोणीच नाही, जनतेचे सेवक आहे तर सेवक पण काम करावे, पण तसं नाही जमणार ना, आधी स्वतःच्या घरात पैसे कसे येतील याचा विचार हे माजलेले लोक करतात. खालच्या पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत सर्व भ्रष्टाचारी असल्यावर सामान्य जनतेच्या समस्या कोण सोडविणार ? 

            जर सरकारी नोकर बनण्यासाठी उच्चशिक्षित/ शिक्षित विद्यार्थांना ३ ते ४ परीक्षा द्याव्या लागतात तर जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्या लोकप्रिनिधीसाठी  परीक्षा का नाही ? सगळी मर मर सामान्य कुटुंबातील तरुणांनी/ तरुणींनी करायची का ? सामान्य कुटुंबातून येऊन सरकार चालवायचं, गुन्हेगार नोंद असताना पक्षात प्रवेश करून करोडोची संपत्ती जमा करून आलिशान बंगले, आलिशान गाड्या घ्यायच्या आणि मिरवायच्या ,श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे आणि गरीब अजून गरीब होत आहे. 

           लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोण पत्रकार, पत्रकारितेची पातळी इतकी खाली घसरली आहे की देशातले ठळक मुद्दे सोडून हिंदु मुस्लिम, आणि फालतू बातम्या दाखवीत असतात. नवीन बातम्या बघण्यासाठी आणि त्या गोष्टीची पूर्ण पडताळणी माहीत करण्यासाठी यूट्यूबर्स ची मदत घ्यावी लागते ही शोकांतिका आहे.

                      आपण समस्येकडे नाही तर उपायाकडे बघितले पाहिजे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता फक्त देशाला एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे प्रामाणिकता. देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपले काम प्रामाणिकरित्या देशाच्या कल्याणासाठी केल्यास आपला देश समृद्ध होण्याच्या मार्गास लागेल.

Saturday, May 18, 2024

स्वभावाच्या लहरी

          एक दिवस असा येतो सकाळी उठायची इच्छा नसते, अस वाटते काहीच करावा नाही फक्त बेडवर पडून राहावं, काही खावं नाही बस आराम करावा. त्यानंतर एखादी दिवस असा अगदी ताकतीने भरलेला असेल काय करू काय नाही असं होईल, काम नसेल तरीही मुद्दामून काही न काही काम काढणार आणि ते पूर्ण करणार. कधी मन खूप आनंदी असेल तर कधी मनात दुःखाचे विचार येतील, कधी काही गोष्टीवर राग सुद्धा येणार हे सर्व प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते.

               प्रत्येक दिवस सारखाच नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे क्षण असतात. त्यामुळे आपण हे सर्व स्वीकारलं पाहिजे आणि हे सर्व सामान्य आहे. आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव झाल्यास आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. स्वतःला खचून जायची परवानगी द्याचीच नाही. आयुष्यात समोर कसे जाता येईल हे बघणे गरजेचं ठरते.

              एकच आयुष्य आहे मनसोक्त जगायचं. आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल विचार करायचं, आपल्याकडे काय नाही हे बघत बसल्यास कायम दुःख वाट्याला येईल. वेळ मिळेल तस नवीन गोष्टी शिकत राहायचं, त्यामुळे आपल्याला विचार करायला वेळच मिळणार नाही.

प्रत्येक गोष्टीला सामना करता आला म्हणजे म्हणता येईल "मी सक्षम आहे."


चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...