Friday, August 15, 2025

ती एक रात्र 🌌

           उन्हाळ्याचे दिवस होते. हळूहळू सूर्य मावळू लागला होता. दिवसभर उन्हाने तापून निघणाऱ्या गच्चीला थंड करायची वेळ झाली होती. टाकीतून पाणी घेऊन पूर्ण गच्चीवर पाण्याचा वर्षाव केला. पाण्याने गच्ची अगदी गार केली. जेवण आटोपून झोपण्यासाठी गाद्या टाकल्या गेल्या. गप्पा गोष्टीचा खेळ संपला आणि सर्व आपल्या आपल्या जागेवर झोपून एकटक आकाशाकडे पाहत राहिले.......

            निरभ्र आकाश आणि त्यात वाऱ्याची थंड झुळूक मनाला गुदगुल्या करत होती.  निरभ्र आकाशाला प्रकाशाची चाहूल लागली होती. आणि ती प्रकाशाची चाहूल पूर्ण करायला लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी संपूर्ण आकाश न्हाऊन निघाले आणि त्यात इवलीशी उगवती चंद्रकोर आसमंताला ध्यास लावून गेली. हे नयनरम्य दृश्य बघण्यात माझे मन रमले होते. खूप कौतुकाने हे दृश्य डोळ्यात सामावून घेत होती. असंख्य असणाऱ्या चांदण्या मोजण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एकटीने मोजता येणारच नाही त्यामुळे सर्वांना कामी लावले पण मोजणी काही थांबेना. अगणित चांदण्यामध्ये सर्वात जास्त चमकणाऱ्या चांदणीला शोधत होते आणि ती गवसली. पूर्ण गोष्ट लक्षात नाही पण म्हणायचे की आकाशात चांदण्यामध्ये आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि त्या बाजूला ३ चोर दिसतात. आणि खरंच ४ चांदण्या आयताकृतीत दिसल्या आणि त्या बाजूला ३ चांदण्यापण दिसल्या.

             चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून फार कौतुक वाटायचं. आपलं जस जग आहे तसंच, त्या चांदण्या पलीकडे पण एक वेगळं जग असेल का ? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आणि पूर्ण सूर्यमालेचे घटकनिर्मिती कशी झाली असेल ? झाडांची आणि प्राण्यांची निर्मिती कशी झाली असेल ? असे प्रश्न मनात यायचे. लहान असताना आपल मन हे किती साध असतं, आपल्याला जे दिसतं त्याचबद्दल आपण साधेपणाने विचार करत असतो. 
              
               आज आधुनिक काळात प्रत्येक गोष्टीच विज्ञान असेल तरीही मला निसर्गाच्या या गोष्टीचं आजही नवलच वाटत. पण आजकाल चांदण्या दिसतातच कुठे ? समोरच्या पिढीला चांदण्या दाखवायच्या तरी कश्या ? आपण निसर्गाची निगा नाही राखली तर निसर्ग सुद्धा आपली निगा करणार नाही. वाढती लोकसंख्या, वाढत प्रदूषण, तापमानवाढ, जंगलतोड इत्यादि गोष्टी निसर्गाला हानी पोहचवत आहेत. म्हणून निसर्गाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी समजून आपल कर्तव्य सर्वांनी पार पाडायला पाहिजेच.


Thursday, August 14, 2025

जीवन हे क्षणभंगुर

खुदकी खामिया देखते देखते, खुदको ना खो देना
सबकी मंजिले अलग अलग, किसीकी ईर्ष्या ना करना


               प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. कोणाला जन्मजात सर्व मिळत असते तर कोणाला ते सर्व मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. समोरच्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपल्याकडे नाही याची नाराजी प्रत्येक व्यक्तीला होतेच हा निसर्गाचा नियम आहे. कोणाला लवकर यश मिळते तर कोणाला उशिरा मिळते. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपण स्वतःची तुलना ही समोरच्या व्यक्ती सोबत करतो. त्या भौतिक, मानसिक गरजाही असू शकतात. तुलना करता करता आपण स्वतःला कमी समजायला लागतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या करू लागतो. 

          आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून जीवन जगण्याला अर्थ आहे. आजच्या आधुनिक काळात पैसा, गाडी, बंगला, नाव, नोकरी या गोष्टींना माणुसकीपेक्षा मोठा दर्जा दिला जातो आहे. कितीही काळ गेले तरी ज्या व्यक्तीत माणुसकी आहे तोच देवाला प्रिय असतो. 

          आपल्या परिस्थितीची माणसाने नेहमी जाण ठेवावी आणि समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीची थट्टा करू नये. सर्व गोष्टी या आदराने घ्याव्या. त्यातच आपली खरी माणुसकी दिसून येते. आपण स्वतः स्वकष्टाने, मेहनतीने कस मोठं होऊ याचा विचार करू समोरचे पाऊल टाकावे.

Saturday, June 28, 2025

कन्यारत्न

       मुलगी होणे म्हणजे माता पित्यांसाठी वरदान आहे आणि जीवनातील सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान आहे. ज्या माता पित्याला कन्यारत्न प्राप्त होते, त्यांनाच हे दान करण्याचे पुण्य मिळत असते. कन्यादान हे म्हणजे लग्नातील एक विधी. संपूर्ण जीवन जवळ असणारी आपली मुलगी आता दुसऱ्या घरी वास्तव्य करणार, सासरी आपल नवीन जग निर्माण करणार या भावनेने व्याकुळ असले तरीही मुलीचे लग्न हे योग्य वयात होणे हे गरजेचे आहे.

           जस व्यक्तीच शिक्षणाचं, नोकरीच एक वय असतं तसंच लग्नाचं वय पण असतं. वेळेत लग्न झाल्यास समोरील आयुष्य कस जगायचं, समोरील आपले नोकरी विषयक निर्णय कसे घ्यायचे, कुटुंब नियोजन कसे करावे हे प्रश्न नवीन पिढी समोर उभे राहतात.

           कोवळ्या वयात असणार चेहऱ्यावरच तेज हे कमी होत जात. आज स्त्री आणि पुरुष हे जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असले तरीही एक गोष्ट अशी आहे जी फक्त स्त्री करू शकते ती म्हणजे बाळंत होणे आणि ही एक स्त्री जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया एका विशिष्ट काळापर्यंत होत असते. लग्नाला उशीर झाल्यास या गोष्टीच नुकसान या नैसर्गिक प्रक्रियेत होते. आणि यामुळे त्या स्त्रीला वेदना सहन कराव्या लागतात. बाईच बाईपण हे खर याच प्रक्रियेमुळे होते. 

           जस शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची ओढ लागते तशीच नोकरी मधे स्थिर झाल्यावर लग्नाची ओढ लागते. आपण ही एक नवीन बंधनात बांधले जावे. जे प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो आनंदोत्सव सारखा पार पाडावा हीच इच्छा असते. नवीन कुटुंबाने आपल्याला आपलेसे करावे आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीत साथ देणारा साथीदार हा प्रामाणिक, निर्व्यसनी, चांगली वागणूक, जबाबदारी सांभाळणारा आणि काळजी घेणारा असावा असच वाटते. 

           लग्नाचे वय झाल्यास मुलीच्या मनात खूप विचार येत असतात. त्या विचारांना बोलण्याची संधी मात्र मिळत नाही पण हा संवाद प्रत्येक घरी व्हायला हवाच. शिक्षण घेतल्यावर सुद्धा बाकीना नोकऱ्या मिळाल्या पण मला नाही मिळाली याची खंत आणि मनात तळमळ असते तसंच आपल्या बरोबरील सर्व संसारात मग्न पण आपण मात्र नोकरी आणि नोकरीच करत आहोत या भावनेने मनाला खंत वाटते आणि मन खायला उठते.

       लोकांकडे बघून जगणे असा संदेश नाहीच पण जीवन हे एकदाच मिळते आणि त्या जीवनात आपण आपल्याला मनातून वाटणाऱ्या गोष्टी केल्यास त्याचा आनंद हा द्विगुणित होतो. शेवटी तात्पर्य हेच की मुलीच्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ द्यावे, शेवटी संसार हा तिलाच करायचा असतो.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...