Sunday, November 03, 2024

मैत्रीण कशी असावी....

एक तरी मैत्रीण अशी असावी
हाक मारताच ती जवळ असावी

महिन्यांनी भेटली तरी नात तेच असावं
प्रेम आणि जिव्हाळा मनापासून असावं

ना सोशल मीडियाचा रोग असावा
ना मैत्रीचा दिखावा असावा

कायम मैत्रीतील प्रेम असावं 
मन भेटण्यासाठी आतुर असावं


Sunday, October 20, 2024

स्वप्न स्वप्नच राहिले

      भविष्यातील आकांक्षा वर्तमानकाळात विचार करून ठेवून त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारी धडपड ही फक्त स्वप्नांसाठी असू शकते. स्वप्न म्हणजे काय ? गाढ झोपेत आपल दिसणार अस्तित्व की आपल्याभोवती दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, हे सर्व खर असल्याचा भास होणारं स्वप्न. दुसरं स्वप्न म्हणजे आपल्या भविष्यात आपल्याला काय हवं आहे हे सांगणारं.

        झोपेत दिसणारी स्वप्ने ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या, कानांनी ऐकलेल्या  किंवा रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीवरचा भास असतो. पण डोळे उघडे ठेवत मनात साठवलेले स्वप्न ही भविष्याची तिजोरीच.

        व्यक्ती जवळील असेल तरीही एकमेकांच्या दूर का जातात ? जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा दुरावा निर्माण होतो. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या की यातना होतात. मग भविष्यासाठी पाहलेली स्वप्न कमळाच्या फुलाप्रमाणे फुलायच्या ऐवजी गळून पडलेल्या पाकळ्यांसारखी झाली तर ? स्वप्नात तर कमळ अपेक्षित होत पण काय मिळालं कोमेजून पडलेल्या पाकळ्या. प्रत्येकाला कमळ मिळेलच असं नाही, कोमेजलेल्या पाकळ्या हातात जरी आल्या तरी त्यातून सुगंध देणाऱ्या अगरबत्ती बनवायची क्षमता असावी.

        माझे ही काही स्वप्न ही स्वप्नच राहिले. वाटायचं भविष्यात आपण पाहलेली  स्वप्न पूर्ण होणार पण तस काही झालं नाही. आता ते सर्व अशक्य वाटू लागले. स्वप्न पूर्ण न होण्याचं दुःख होतं पण त्याहून नवीन रमणीय स्वप्न पाहण्याची दिशा मिळाली.

         आयुष्यात पाऊल थांबता कामा नये. पाऊल थांबलं म्हणजे प्रगती थांबली. एक एक पाऊल टाकत कधी आयुष्याचे धडे गिरवत यशापर्यंत पोहचणार हे कळणार पण नाही. आपल्या हातून काय निसटून गेलं यापेक्षा आता आपण काय हातात पकडू शकू याच प्रेरणेने जीवन जगणं महत्त्वाचं आहे 

Sunday, October 13, 2024

समुद्र 🌊

भरतीच्या प्रवाहाने पाय झाले ओलेचिंब
निळ्याशार पाण्यात पाहिले मी माझे प्रतिबिंब 

अलगद पायाखालून रेतीचे कण निसटून गेले
मोत्यांचे आणि शंख-शिंपल्यांचें ते माहेर घर झाले

अथांग अश्या समुद्राने पाहिले सूर्यास्ताचे रूप
क्षणात दिसले आकाशात डौलदार रंगांची झेप

वाहत येणाऱ्या लाटांनी कानाला दिली साद 
पाण्याच्या प्रवाहापुढे कशाची चालत नाही दाद 

सागराचं आणि शितल चंद्राचं नात हे वेगळं
 प्रेमाचा जिव्हाळा आणि भरती-ओहोटीचा खेळ

समुद्राचे रूप पाहून मन झाले बेभान
वर्षातून एकदा तरी भेट देता यावी किमान

 हृदयात साठून गेली विशाल समुद्राची दृष्टी 
किमया त्या देवांची ज्यांनी निर्माण केली हि सृष्टी



चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...