Tuesday, September 19, 2023

इच्छा तिथे मार्ग

                      काही गोष्टींचा विचार आपल्या मनात संचारत असतो आणि ती गोष्ट करायची आपली खूप मनापासून इच्छा असते परंतु काही कारणास्तव ती होणार नाही किवा वेळ नाही यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. माझ्यासोबत होत अस कधी कधी. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग तसच काही झाल आणि देवाच्या इच्छेने माझी इच्छा पूर्ण झालीच, देवाने कार्य माझ्या हातून केले असले तरीही करविता देवच आहे. 

                      वर्षातून एकदा देव बाप्पा म्हणजेच आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात, सर्व भक्त उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन करतात. गणपती उत्सव जवळ येताच मला पण विचार आला की आपण पण देव बाप्पाच्या स्वतःच्या हाताने घडवलेल्या मूर्तीचे  पूजन करावे. पण आगमनाच्या काही दिवस आधी मला मूर्ती बनवणे शक्य झाले नाही. मनात इच्छा तर होतीच पण आता वेळेवर कस काय होणार म्हणून  आपण नेहमीसारखी पूजा करावी पण देवाला वाटले असेल हिला प्रोत्साहन द्याव म्हणजे बरोबर ही करेल आणि तसच झाल मला ते  मिळाल आणि लगेच मूर्ती बनवायला लागली. एकीकडे बाप्पाचे भजन कानी येत होते आणि एकीकडे हाताने मूर्तीला आकार द्याला सुरुवात केली. संध्याकाळचे २ तास कसे निघून गेले कळले नाही. इतक्या कमीवेळेत मूर्ती तयार करणे सोपे नव्हते परंतु मनात इच्छा होती श्री गणेश चतुर्थी ला स्वतः ने बनवलेल्या मूर्तीची पूजा करायचीच आणि हे सर्व घडून फक्त देवाच्या आशीर्वादाने😊. 


तू सुखकर्ता तू  दुःखहर्ता 

तूच कर्ता आणि करविता 

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया  


सर्वाना  श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 😊


#गणेशोत्सव २०२३



Thursday, July 27, 2023

पाऊसधारा

सूर्यास्ताची वेळ होती, सूर्य नजरेतून हळूवार पणे अंधाराची चाहूल लावून मावळला आणि विजेच्या लखलखीत प्रकाशाने आभाळ दाटून गेलं. बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली, एकीकडे गर्जना करत, प्रकाशित विजेचा कडाडणारा आवाज आणि दुसरीकडे लोखंडाच्या टिनावर पडलेल्या टपोऱ्या पावसाचे थेंब यांचे आवाज कानी पडत राहिले, तितक्यात विजेचा दिवा बंद झाला आणि मेणबत्तीची आठवण आली, छोट्याश्या एका ज्योतीने पूर्ण खोलीभर प्रकाश पसरवला. उजेड तर मिळाला पण पावसाचे काय, खिडकीवाटे बाहेर डोकावून पाहले तर समोरची इमारत दिसेनाशी झाली, नजरेस सर्व अस्पष्ट दिसू लागले.

खिडकी जवळ खुर्चीवर बसून थंड हवेचा आस्वाद घेण्यात माझे मन रमले होते, तितक्यात मनात विचार आला, इतका हा असा मुसळधार पाऊस दिवसा आला तर घराबाहेर पडणं सुद्धां अशक्य होईल, सर्वांचं काम ठप्प होईल पण कदाचित पावसाला आपण कधी धरणी वर जोरदार वर्षाव करावा हे ठाऊक असेल, पण आपल तर बर आहे राहायला जागा आहे पण ज्यांना राहायला जागा नाही ते या परिस्थितीला कशी मात देत असतील हे अवघडच आहे.

पूर्ण रात्र पावसाचे थैमान सुरू होते, मुसळधार पाऊस आणि विजा. अचानक पहाटे ५ ला जाग आली आणि बघते तर पाऊस सुरूच आणि विजा सुद्धा सुरू होत्या. वातावरणात उजेड पसरू लागला आणि ऊन सुद्धा निघालं. यावर्षीच्या पावसाळयात पहिल्यांदाच असा पावसाचा अनुभव घेतला.

काही गोष्टी अश्या असतात ज्या प्रत्येकवेळी कामी येणारच अस नाही पण जेव्हा त्याची गरज पडते ती आपल्यासोबत असणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते जसे की मेणबत्ती. निसर्गाशी कधीच खेळ करू नये. हवा, पाणी, वीज आणि अग्नी याची ताकत असामान्य आहे. आधीचा दिवस कितीही कठोर, संघर्षमय गेला तरी येणारा दिवस नवीन संधी निर्माण करून आयुष्याचा आनंद देतो.

पाऊस पाहिला की तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा.

Saturday, July 08, 2023

व्यक्त व्हायला शिका

                          जेव्हापासून मी माझे ब्लॉग लिहिणे सुरू केले तेव्हापासून एखादी मनात विचार आला किवा एखाद्या गोष्टीची मनात कायम चर्चा सुरू असली की माझा हात लॅपटॉपकडे जातो आणि त्यात ब्लॉगवर पटापट शब्द लिहायला लागते. माझ्या मते लिखाण हे आपले विचार मांडण्याचे प्रखर माध्यम आहे, असही होऊ शकते आपण जो विचार करत आहोत तोच विचार दूसरा व्यक्ती सुद्धा करू शकतोच.

                         समाधानी असणे हा जीवनाचा मी मूलमंत्र मानते. पण प्रत्येकच प्रसंगाला आपण समाधानी राहुच अस होत नाही. आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रूसतो, कधी रागात असतो तसेच कधी कधी मन समाधानी नसते. आणि यात काही वेगळ नाहीच हे साहजिक आहे. 

                        आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यात सर्व छान चाललंय तरीही आपण कुठेतरी कमी पडतो आहो याचा विचार सुद्धा येतो, अजून काय करायला हवे, आपण स्वावलंबी झालो आहोत, महिन्याच्या शेवटी कामाचा मोबदला मिळतो, कामा व्यतिरिक्त आपण स्वतःच्या आवडी निवडी जपत आहोत, गरजेच्या वस्तु मिळत आहेत, सर्व काही असून पण कुठे तरी कमीपणा भासतो. जसा वाघ शिकार मिळवण्यासाठी धडपडत असतो तसा जीवनाकडे एका स्पर्धेप्रमाणे पाहल्यास आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आवश्यक असते.

प्रत्येकाच जीवन सारख नसलं तरीही त्यात मात्र साम्य असतेच.. कोणाला लवकर यश पदरी येत कोणाला उशिरा, कोणाला लवकर प्रगल्भता लाभते कोणाला उशिरा त्यामुळे कोणी समोर नसते कोणी मागे नसते सर्व आपल्या वेळेप्रमाणे आपल जीवन जगत असतात.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...