सूर्यास्ताची वेळ होती, सूर्य नजरेतून हळूवार पणे अंधाराची चाहूल लावून मावळला आणि विजेच्या लखलखीत प्रकाशाने आभाळ दाटून गेलं. बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली, एकीकडे गर्जना करत, प्रकाशित विजेचा कडाडणारा आवाज आणि दुसरीकडे लोखंडाच्या टिनावर पडलेल्या टपोऱ्या पावसाचे थेंब यांचे आवाज कानी पडत राहिले, तितक्यात विजेचा दिवा बंद झाला आणि मेणबत्तीची आठवण आली, छोट्याश्या एका ज्योतीने पूर्ण खोलीभर प्रकाश पसरवला. उजेड तर मिळाला पण पावसाचे काय, खिडकीवाटे बाहेर डोकावून पाहले तर समोरची इमारत दिसेनाशी झाली, नजरेस सर्व अस्पष्ट दिसू लागले.
खिडकी जवळ खुर्चीवर बसून थंड हवेचा आस्वाद घेण्यात माझे मन रमले होते, तितक्यात मनात विचार आला, इतका हा असा मुसळधार पाऊस दिवसा आला तर घराबाहेर पडणं सुद्धां अशक्य होईल, सर्वांचं काम ठप्प होईल पण कदाचित पावसाला आपण कधी धरणी वर जोरदार वर्षाव करावा हे ठाऊक असेल, पण आपल तर बर आहे राहायला जागा आहे पण ज्यांना राहायला जागा नाही ते या परिस्थितीला कशी मात देत असतील हे अवघडच आहे.
पूर्ण रात्र पावसाचे थैमान सुरू होते, मुसळधार पाऊस आणि विजा. अचानक पहाटे ५ ला जाग आली आणि बघते तर पाऊस सुरूच आणि विजा सुद्धा सुरू होत्या. वातावरणात उजेड पसरू लागला आणि ऊन सुद्धा निघालं. यावर्षीच्या पावसाळयात पहिल्यांदाच असा पावसाचा अनुभव घेतला.
काही गोष्टी अश्या असतात ज्या प्रत्येकवेळी कामी येणारच अस नाही पण जेव्हा त्याची गरज पडते ती आपल्यासोबत असणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते जसे की मेणबत्ती. निसर्गाशी कधीच खेळ करू नये. हवा, पाणी, वीज आणि अग्नी याची ताकत असामान्य आहे. आधीचा दिवस कितीही कठोर, संघर्षमय गेला तरी येणारा दिवस नवीन संधी निर्माण करून आयुष्याचा आनंद देतो.
पाऊस पाहिला की तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा.
No comments:
Post a Comment