Saturday, September 27, 2025

असा असावा साथीदार 💞

कसा असावा साथीदार तर तो असा असावा


आयुष्यात चॉकलेट देणारा नसेल तरी चालेल पण 
वेळ आल्यावर गोळ्या आणि औषध देणारा असावा

प्रेमाची कबुली देणारा नसेल तरी चालेल पण
 कृतीतून प्रेम व्यक्त करणारा असावा

आनंदाच्या क्षणी सोबत नसेल तरी चालेल पण
 दुःखात असताना साथ देणारा असावा

भेटवस्तू देणारा नसेल तरी चालेल पण
 डोळ्यातले अश्रू पुसून चेहऱ्यावर हास्य देणारा असावा

स्वप्न दाखवणारा नसेल तरी चालेल पण 
स्वप्न सत्यात उतरवायची धमक असणारा असावा

परीकथेतील राजकुमार नसेल तरी चालेल पण 
खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व आदर्श असा असावा

परदेशी नेणारा नसेल तरी चालेल पण 
आवडत्या ठिकाणी फिरायला नेणारा असावा

स्वयंपाक नाही आला तरी चालेल पण 
सोबतीने जेवणाचा आस्वाद  घेणारा असावा

संपूर्ण आयुष्य सुखाचे नसेल तरी चालेल पण 
प्रत्येक क्षणाला साथ निभावणारा असावा

वारंवार कौतुक करणारा नसेल तरी चालेल पण
मनातून कौतुकाची थाप देणारा असावा

पैशाने श्रीमंत नसेल तरी चालेल पण 
मनाने, स्वभावाने आणि माणुसकीने श्रीमंत असावा

माफी मागणारा नसेल तरी चालेल पण
कायम सत्याच्या मार्गाने जाणारा असावा

गोड गोड बोलणारा नसेल तरी चालेल पण
चार चौघात बायकोचा सन्मान ठेवणारा असावा


कसा असावा साथीदार तर तो असा असावा.


Sunday, September 14, 2025

दुर्गती

             कधी कधी मनात विचार येतो, आजूबाजूला किती विचित्र गोष्टी घडत आहेत. नवरात्री सणाला स्त्रीरूपी असणाऱ्या देवीच पूजन केलं जाते. मनोभावे अर्चना केली जाते तो स्त्रीशक्तीचा मान सुद्धा आजची स्त्री ठेवू शकत नाही आहे.

            २०१६ साली जियो कंपनी मार्फत मिळणारा मोफत डेटा आणि कोरोना काळात घरी राहून मोबाईलचा वाढलेला वापर त्यात भर घालणारं सोशल मीडिया. आधीची स्त्री ही स्वतःच्या शरीराला जपायची. डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडू द्यायचा नाही मात्र आजकाल लोकांना दाखवायला ब्लाऊज घालून पदर पाडतात. काही मूर्ख लोक शरीर दाखवून पैसे कमवण्याच्या नादात बुडाले आहेत. आधी कपडे बदलण्यासाठी खोलीचा वापर करायचे मात्र आता कॅमेरा शिवाय पान हलत नाही. लाज- लज्जा सर्व सोडून ही कामे वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया वर चालू आहेत. 

          या गोष्टीमुळे किती नुकसान होत आहे हे कदाचित सरकारला दिसत नसावे. आपल्या सोशल मीडियावर अनेक लोक असे फोटो, व्हिडिओ बघते आहे हे माहिती असून ते स्वतःच्या फायद्याचे विचार करत बसले आहे.

        देशात वाढणाऱ्या बलात्काराला हे ही तितकेच महत्त्वाचे कारण आहे. अडचणीत किंवा एकट्या दिसणाऱ्या मुलीवर अत्याचार होतो. आता म्हणणार माणसाने पण चांगलं वागलं तर अशा घटना थांबू शकतात. ज्या व्यक्तीने चांगल शिक्षण घेतलं आहे ज्यात संस्कार आहे तोच अस वाईट कृत्य करणार नाही परंतु मागासलेल्या क्षेत्रामध्ये किती तरी लोक अशिक्षित असतात आणि त्यांना मुलींचा, बाईंचा आदर कसा करावा हेच माहिती नसते.

               सांगायचं म्हटलं तर माणूस हा वाईट नसतोच पण सभोवतालचे वातावरण, संस्कार यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक दृष्टीने वाढ होत असते. प्रत्येक देशाला ताकद आणि कमकुवतपणा असतो. पण तोच कमकुवतपणा कसा दूर करता येईल याचा विचार कोणी करत नाहीच. 

Sunday, September 07, 2025

यातना

         प्रत्येकाला कधी कधी जीवनात यातना सहन कराव्या लागतात. जोपर्यंत मेहनत नाही तोपर्यंत पैसे नाही आणि पैसे नाहीतर काही नाही. पैसे हे सर्वस्व नाहीच पण आजच्या काळात पैशाशिवाय काही होत नाही.

          कित्येक नोकरदार हे त्यांना न आवडणार काम करत असतात. काम कशासाठी तर हातात ४ पैसे यावे यासाठी सर्व मेहनत असते. कोणाच स्वप्न हे काही वेगळं असते मात्र पैशाखातीर नाईलाजाने काम करावं लागत. महिन्याच्या शेवटी मिळालेला कामाचा मोबदला नोकरी सोडण्याच्या विचारला दूर ठेवतो. रोज कामाच्या ठिकाणी प्रवास करणे, काम करणे त्यानंतर घरची सुद्धा कामे करणे हे काही साधारण नाहीच. मनात काहीतरी वेगळ करण्याची इच्छा असेल तरीही कधी कधी नाईलाजाने त्या करता येत नाही.
 
               कितीही त्रासदायक प्रवास असला तरीही त्या नोकरीमुळे आपलं घर चालते यात समाधान असते. आजच्या काळात पैशाला खूप महत्त्व आहे. पैसे कमावणे ही एक काळाची गरजच झाली आहे. नोकरी असेल तर लोक सुद्धा २ शब्द गोड बोलतात मात्र बेरोजगार असणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. समोरील व्यक्तीकडे किती पैसे आहे यावरून त्याला आदरपूर्वक वागणूक दिली जाते.

वाढती महागाई बघता एकट्या व्यक्तीने घर सांभाळणं कठिणच होत चाललंय. ज्या कामामुळे आपल्या घरी लक्ष्मी येते त्या कामाचा आदर करायलाच हवा.


Tuesday, September 02, 2025

द्विगुणी रूप

             आपले जग हे फार मोठे आहे. संपूर्ण आयुष्याच्या काळात अनेक लोकांच्या गाठी भेटी होतात, मैत्री होते. प्रत्येकाचा स्वभाव, बोलण्याची शैली, वागणूक ही वेगळी असते. काही लोकांचे बोलणे आपल्याला पटते मात्र काही लोकांविषयी आपल मत हे वेगळं असतं. सगळे आपल्या आयुष्यात मग्न असतात.

              अंतरंग आणि बाह्यरंग असे २ रूप असतात. म्हणतात ना कधी कधी आपल्याला वाटते तशी ती व्यक्ती नसते. मनात वेगळं आणि बाहेर वेगळं. कधी कधी म्हणतात की ही व्यक्ती अगदी नारळाप्रमाणे आहे, आतून गोड आणि बाहेरून कडक म्हणजेच शिस्तीचा. प्रत्येक व्यक्तीची ही २ रुपे असतातच. समाजात वावरताना या गोष्टी लक्षात येतातच. आपण आपल्या आयुष्यात चांगले राहिलो तरी आपल्या विषयी समोरच्या व्यक्तीच वेगळं मत राहू शकते, एकतर ती व्यक्ती खूप जवळची असावी किंवा ती व्यक्ती आपल्याला फार ओळखत नसावी.

              जसे नाण्याला २ बाजू असतात तसेच माणसाच्याही २ बाजू असतात. आपली बाजू ही सर्वांनाच पटेल असेही नाही. त्यामुळे वैचारिक भिन्नता आढळते. सामाजिक वातावरण बघून निर्णय घेणे आवश्यक असते. 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...