Saturday, June 28, 2025

कन्यारत्न

       मुलगी होणे म्हणजे माता पित्यांसाठी वरदान आहे आणि जीवनातील सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान आहे. ज्या माता पित्याला कन्यारत्न प्राप्त होते, त्यांनाच हे दान करण्याचे पुण्य मिळत असते. कन्यादान हे म्हणजे लग्नातील एक विधी. संपूर्ण जीवन जवळ असणारी आपली मुलगी आता दुसऱ्या घरी वास्तव्य करणार, सासरी आपल नवीन जग निर्माण करणार या भावनेने व्याकुळ असले तरीही मुलीचे लग्न हे योग्य वयात होणे हे गरजेचे आहे.

           जस व्यक्तीच शिक्षणाचं, नोकरीच एक वय असतं तसंच लग्नाचं वय पण असतं. वेळेत लग्न झाल्यास समोरील आयुष्य कस जगायचं, समोरील आपले नोकरी विषयक निर्णय कसे घ्यायचे, कुटुंब नियोजन कसे करावे हे प्रश्न नवीन पिढी समोर उभे राहतात.

           कोवळ्या वयात असणार चेहऱ्यावरच तेज हे कमी होत जात. आज स्त्री आणि पुरुष हे जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असले तरीही एक गोष्ट अशी आहे जी फक्त स्त्री करू शकते ती म्हणजे बाळंत होणे आणि ही एक स्त्री जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया एका विशिष्ट काळापर्यंत होत असते. लग्नाला उशीर झाल्यास या गोष्टीच नुकसान या नैसर्गिक प्रक्रियेत होते. आणि यामुळे त्या स्त्रीला वेदना सहन कराव्या लागतात. बाईच बाईपण हे खर याच प्रक्रियेमुळे होते. 

           जस शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची ओढ लागते तशीच नोकरी मधे स्थिर झाल्यावर लग्नाची ओढ लागते. आपण ही एक नवीन बंधनात बांधले जावे. जे प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो आनंदोत्सव सारखा पार पाडावा हीच इच्छा असते. नवीन कुटुंबाने आपल्याला आपलेसे करावे आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीत साथ देणारा साथीदार हा प्रामाणिक, निर्व्यसनी, चांगली वागणूक, जबाबदारी सांभाळणारा आणि काळजी घेणारा असावा असच वाटते. 

           लग्नाचे वय झाल्यास मुलीच्या मनात खूप विचार येत असतात. त्या विचारांना बोलण्याची संधी मात्र मिळत नाही पण हा संवाद प्रत्येक घरी व्हायला हवाच. शिक्षण घेतल्यावर सुद्धा बाकीना नोकऱ्या मिळाल्या पण मला नाही मिळाली याची खंत आणि मनात तळमळ असते तसंच आपल्या बरोबरील सर्व संसारात मग्न पण आपण मात्र नोकरी आणि नोकरीच करत आहोत या भावनेने मनाला खंत वाटते आणि मन खायला उठते.

       लोकांकडे बघून जगणे असा संदेश नाहीच पण जीवन हे एकदाच मिळते आणि त्या जीवनात आपण आपल्याला मनातून वाटणाऱ्या गोष्टी केल्यास त्याचा आनंद हा द्विगुणित होतो. शेवटी तात्पर्य हेच की मुलीच्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ द्यावे, शेवटी संसार हा तिलाच करायचा असतो.

Sunday, May 04, 2025

आकाशातले मोती

            निसर्ग हा किती निराळा आहे. निसर्गाचं प्रत्येक रूप हे माणसाच्या जीवनाशी निगडित असतं. निसर्गाचं वेगळं रूप, वेगळे रंग, त्यातून दरवळणारा सुगंध, आश्चर्यचकित करणारं दृश्य, मनाला तृप्त करणारं आणि डोळ्यांना सुखद अनुभव देणार एक रहस्यमय,अद्भुत देवाची निर्मिती.

           मनाला वेड लावलं तर निसर्गाचे बदल हे नक्कीच जादूचे प्रयोग वाटतील. एकीकडे पृथ्वीला प्रकाशमय करणारा सूर्य आणि दुसरीकडे टपोऱ्या पावसाचे थेंब आणि गारा. आजही पाऊस आला की त्यात भिजावे वाटते, पावसाचा आनंद घ्यावा वाटतो, नाचावे वाटते, पेपर ची होडी करून पाण्यावर तरंगवावी वाटते, लहान मुलाप्रमाणे अल्लडपणा करावा वाटतो. निसर्ग गोष्टच अशी आहे की मनाला मोहून टाकते, प्रत्येकाला प्रेमात पाडेल असा हा पाऊस पृथ्वीला जस गार करतो तस मनाला वेगळ्या भावना सोबत जोडतो.

           प्रत्येक गोष्टीचं विज्ञान जरी माहीत असलं तरीही अल्लड बनून प्रत्येक क्षण साजरा करण्याला वेगळाच आनंद असतो. चक्क उन कडाडणाऱ्या मे महिन्यात आकाशातून पडलेल्या थंडगार गारा हातात पकडता पकडता पाण्यात रूपांतर झाल्या. 

                  त्या गारा सुद्धा काही वेळ साठीच गारा असतात पण नंतर ते पाणी होत, गारा पडल्या की सर्वांना नवल वाटत पण गारांच अस्तित्व मूळ हे पाणीच. अगदी मोत्याप्रमाने दिसत आहे पण वेळ गेल्यावर हातात काहीच उरत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची इच्छा असावी. मन आनंदी असल्यास मोठ संकट सुद्धा दूर करण्याची ताकद येते.


   

Sunday, April 20, 2025

मराठीचे भवितव्य : आपली जबाबदारी

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा

           या गीताला आपल्या महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून राज्यसरकारने घोषित केले. आपल्या देशात २२ भाषा प्रचलित आहेत. त्यापैकी महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी. 

               आताच्या काळात इंग्रजीचं इतक वर्चस्व वाढलंय की  लोकांना मराठी बोलताना मध्येच इंग्रजी शब्द बोलायची सवय झाली आहे. म्हणजे ना पूर्ण मराठी ना पूर्ण इंग्रजी. नक्कीच इंग्रजी ही काळाची गरज आहे पण आपली मातृभाषा टिकून राहणे हे आपलीच जबाबदारी. समोरच्या पिढीला मराठीचं महत्त्व कळाव यासाठी आपली मातृभाषेत बोलणे हे गरजेचे आहे.

          एक दिवस मेट्रो ने प्रवास करते वेळी रांगेत उभ न राहता समोर समोर करणाऱ्या व्यक्तीला मी म्हणाले " आपको लाईन नही दिख रही क्या ? बीच में कैसे आ रहे हो ?
हे वाक्य विचार न करता तोंडून निघून गेले. पण लगेच विचार आला मी हिंदीत का बोलले, आपली भाषा मराठी आहे तर मराठीतच शब्द निघायला हवे होते. माझी हिंदी इतकी स्पष्ट नाही पण मराठी बोलताना गोडवा वाटतो.

                नोकरी मुळे इंग्रजीचा पगडा वाढलाय आणि प्रत्येकाला मराठी कळत नाही त्यामुळे हिंदीचा वापर वाढलाय.. तरीही एखादी गोष्ट व्यक्त करायला आपली मातृभाषाच गोड वाटते. मराठी असल्याचा गर्व वाटतो आणि शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा आदर वाटतो.

               प्रत्येकाला प्रत्येक भाषेचा आदर असावा. भाषेची सक्ती नको पण थोडीफार दुसरी भाषा ही शिकण्याची आवड असावी. भारतात अनेक ठिकाणी भाषेमुळे वाद होत असताना आपल्याला दिसतात पण ते वाद न करता समजूतदारपणे प्रश्न कसा सोडवावा याकडे बघितले पाहिजे. भाषेचा अनादर करणे म्हणजे त्या मातृभूमीचा अनादर करणे होय. शेवटी भारत हा सर्वांचा देश आहे.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...